
अमळनेर : तालुक्यातील नगाव खुर्द शिवारातील शेत गट क्रमांक ७६ मध्ये शेतकऱ्याच्या मक्याच्या कणसांच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागल्याची घटना १९ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत अंदाजे दोन लाख रुपये किंमतीचे मक्याचे कणसे जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
नगाव बु. येथील शेतकरी राजेंद्र रामलाल पाटील (वय ६०) यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे. त्यांनी नगाव खुर्द शिवारात दोन हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड केली होती. कापणीनंतर मक्याची कणसे शेतातच साठवून ठेवलेली असताना पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास या ढिगाऱ्याला आग लागली.
या घटनेची माहिती गावातील नंदु परिक्षित पाटील यांनी शेतकऱ्याला मोबाईलवरून दिली. त्यानंतर पोलीस पाटील प्रविण गोसावी, कोतवाल राहुल पाटील तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता मक्याची कणसे पूर्णपणे जळून राख झाल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आकस्मिक आगीचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय भोई हे करीत आहेत.




