शहापूर शिवारातील घटना, मारवड पोलीसात तक्रार दाखल…
अमळनेर:- येथून जवळच वाहणाऱ्या पांझरा नदीवर असलेल्या विहिरींची व पाणी उपसा करणाऱ्या मोटारींची तांब्याच्या तारेची चोरी करणारी टोळी सक्रिय असून शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असतानाच शहापूर शिवारात भर दिवसा केबल चोरून नेणाऱ्यास दुपारी २ वाजता स्वतः शेतकऱ्यांनी एकास रंगेहाथ पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले व दुसरा पळून गेला आहे.
हे केबल चोरटे गेल्या अनेक दिवसांपासून सक्रिय असून एन पाणी भरण्याची धावपळीच्या काळात तांब्याच्या केबल वायर चोरून त्या सुनसान ठिकाणी जाळून त्यातील तांबे विक्रीतून पैसा मिळविण्यासाठी चोरटे भर दिवसा नदी पात्रात फिरून चोरी करू लागल्याने शेतकऱ्यांनी टप्प्या टप्प्यात पाळत ठेवून दिनांक १७ रोजी दुपारी २ वाजता शहापूर शिवारातील विहीरीवर विद्युत मोटार सुरू करण्यासाठी जात असलेल्या सुनील वामन पाटील या शेतकऱ्यास दोन अनोळखी इसम शेती उपयोगसाठी वापराची तांब्याची केबल वायर चोरून नेत असताना रंगेहाथ मिळून आले. त्यातील एकाने मोटारसायकल वरून पळ काढला मात्र एकास आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मिळून पकडले. त्याने आम्ही दोन्ही केबल वायरची चोरी करत असल्याचे कबूल केल्याने त्यास पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. शेतकरी सुनील वामन पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात चंद्रकांत ज्ञानेश्वर कोळी (वय २२) व उमेश संजय कदम दोन्ही राहणार बिलाडी ता जिल्हा धुळे यांच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार किशोर पाटील करीत आहेत.