
प्रताप महाविद्यालयात मराठी भाषा व रोजगाराच्या संधींवर व्याख्यान संपन्न
अमळनेर : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषिकांना नोकऱ्यात मुबलक संधी आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता या नवीन तंत्रज्ञानाला न घाबरता त्यातून मिळणाऱ्या नवीन संधीचा फायदा भाषेच्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. संदीप माळी यांनी खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील (स्वायत्त) मराठी विभाग आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित अतिथी व्याख्यानमालेतील दुसऱ्या दिवशीच्या सत्रात केले.
यावेळी डॉ. माळी यांनी मराठी भाषिकांना उपलब्ध असलेल्या विविध रोजगाराच्या संधींचा सखोल आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांनी मराठी भाषेतील अनुवाद, संपादन, पत्रकारिता, प्रसारमाध्यमे, प्रशासकीय सेवा, संशोधन, अध्यापन, डिजिटल माध्यमे तसेच नव्या तंत्रज्ञानाशी निगडित क्षेत्रांमधील रोजगाराच्या संधींचे तपशीलवार विवेचन केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावामुळे भाषेच्या रोजगाराच्या संधी नष्ट होतील, ही भीती निराधार असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, एआयमुळे भाषिक रोजगार संपणार नसून त्यांचे स्वरूप बदलणार आहे. नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत कौशल्ये आत्मसात केल्यास मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी अधिक व्यापक होतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमात मराठी विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी समारोपात डॉ. माळी यांनी मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांना अर्थार्जन करण्याचे वेगळे मार्ग सांगितल्याबद्दल आभार मानून विद्यार्थ्यांनी जर वक्तृत्व, लेखन ही भाषिक कौशल्य आत्मसात केले तर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अर्थार्जन नक्कीच करता येईल, असे मत मांडले.
यावेळी विभागातील डॉ. विलास गावीत, प्रा. तुषार पाटील, प्रा. सागर सैंदाणे, प्रा. गोपाल बडगुजर तसेच महाविद्यालयातील विविध विद्याशाखांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सागर सैंदाणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोपाल बडगुजर यांनी केले.




