
महाराष्ट्रातून चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यशाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील रहिवासी श्री.नितीन प्रभाकर सनेर (मुळगांव हातेड बु।। ता.चोपडा) यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉ.चेतन नितीन सनेर यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या वैद्यकीय शिक्षणाच्या अत्यंत प्रतिष्ठित,सर्वोच्च पातळीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या डीएम गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी (पोटविकारशास्त्र/ पचनसंस्था), सुपर स्पेशालिटी या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांत मुंबई स्थित प्रतिष्ठित सेठ जी.एस.मेडिकल कॉलेज व केईएम हॉस्पिटल मुंबई येथून विद्यापीठांत चौथ्या क्रमांकाने उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होऊन दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
डॉ.चेतन सनेर यांनी याआधीही अथक प्रयत्न करून आपले व आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता रात्रंदिवस मेहनत व अभ्यास करून चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशोशिखरे पादाक्रांत करीत एमबीबीएस व एमडी जनरल मेडिसिन या प्रतिष्ठित अभ्यासक्रमांकरिता मुंबई स्थित प्रतिष्ठित सेठ जी.एस.मेडिकल कॉलेज व केईएम हॉस्पिटल मुंबई येथे प्रवेश मिळवून उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होऊन यश संपादन केलेले आहे.
डॉ.चेतन सनेर हे मुंबई येथील केईएम रुग्णालयांत कार्यरत आहेत. त्यांना रुग्णालयांत रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली. डॉ.चेतन सनेर यांनी कोरोना काळात केईएम रुग्णालय मुंबई व अमळनेर, मारवड,हातेड पंचक्रोशीत रुग्णसेवा करून अतिउत्कृष्ट कामगिरी देखील बजावलेली आहे. तसेच वरील अभ्यासक्रमांत महाराष्ट्रातून व विद्यापीठातून चौथ्या क्रमांकाने उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होऊन त्यांनी यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. डॉ.चेतन सनेर हे बोहरा येथील ग्रामविकास अधिकारी श्री.रवींद्र प्रभाकर सनेर यांचे पुतणे आहेत.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीत आई-वडील,आजी व परिवारातील इतर सदस्य, गुरुजन,हितचिंतक व नातेवाईक यांचा मार्गदर्शक म्हणून मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस सतत यश आणि उज्वल समाधानकारक भविष्यासाठी समाजातील विविध स्तरातून मान्यवरांकडून शुभेच्छा,अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.




