
रानडुक्करांची शिकार करण्यासाठी गेलेल्या एकाचे हात व गालाचे तोडले लचके…
अमळनेर:- तालुक्यातील गंगापुरी खापरखेडा शिवारात बिबट्याने एकावर हल्ला केल्याने सावखेडा येथील 44 वर्षीय रुपसिंग शंकर बारेला हा जखमी झाला असून त्याच्यावर पातोंडा आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे, दरम्यान वन विभागाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता घटनास्थळी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत, शिवारात बिबट्या आढळून आल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
तालुक्यातील गंगापुरी खापरखेडा शिवारात सोमवारी दुपारी सावखेडा येथील काही जण रानडुक्करांची शिकार करण्यासाठी आले होते. एन डी पाटील आणि प्रमोद पाटील यांच्या शेताच्या दरम्यान रानडुक्करासाठी लावलेल्या फास्यात बिबट्या अडकला होता त्याचवेळी तिथे रुपसिंग बारेला आणि इतर पोहचले त्याचवेळी बिबट्याने रुपसिंग सह एका वर हल्ला केला असता रुपसिंग यांच्या गाल व हाताचे लचके बिबट्याने तोडले आहेत. बिबट्याने हल्ला केल्याचे समजताच आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी जमा झाले. तातडीने जखमीला पातोंडा येथे नेले असता त्यांच्यावर दहिवद उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी घनश्याम पाटील, आरोग्य सहायक संजय पाटील यांनी प्राथमिक उपचार केले त्यानंतर त्याला चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. स्थानिकांनी वन विभागाला संपर्क केला असता वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पारोळा देसले, वन परिमंडळ अधिकारी अमळनेर पी. जे. सोनवणे, आर.बी. भदाणे, वनरक्षक आर. एस. वेलसे,श्रीमती. देवरे, सूर्यवंशी, कुंभारे, पाटील मॅडम यांच्या पथकाने भेट देऊन परिसराची पूर्ण पाहणी केली. घटनास्थळी बिबट्या या वन्यप्राण्यांचे पायाचे ठसे आढळून आले असल्याने वन विभागाने गावात जाऊन गावकऱ्यांना सतर्क राहण्या बाबत सूचना केली आहेत. दरम्यान ऐन पेरणी च्या वेळी बिबट्या आढळून आल्याने शेतकरी आणि मजूर वर्गात भीतीचे वातावरण आहे.







