सागर मोरे
अमळनेर:-तालुक्यातील तापी नदी काठावरील निमगव्हाण येथील दादाजी धुनिवाले दरबारात श्री स्वामी भक्तानंद गुरू रेवानंद परमहंस हे श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठापनामार्फत १९४८ सालापासुन सुर्यकन्या तापीमाई जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर तापीमाई पोथी वाचन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे मुरलीधर जोशी कुरवेलकर यांनी सालाबाद प्रमाणे पोथी वाचनास प्रारंभ केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुर्यकन्या तापीमाई कथा व पोथी वाचन, तसेच अखंडपणे नामस्मरण व हवन सप्ताह आषाढ शुद्ध प्रतिपदा दि. 30 जुन पासून सुरुवात झाली आहे. ती आषाढ शुद्ध सप्तमी दि.6 जुलै रोजी पर्यंत सुरू असणार आहे.पोथी समाप्ती व तापीमाई जन्म बुधवारी दि.६ रोजी होणार आहे. हाच सोहळा तापी माई जन्मसोहळा म्हणून प्रसिद्धीस आहे. स्वामी भक्तानंद गुरू रेवानंद परमहंस,जय श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान निमगव्हाण मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व तापी माईचा जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून सोहळा द्विगुणीत करावा असे आवाहन प्रतिष्ठानद्वारे करण्यात आले आहे.