आप्तांची माणस, घराचे आधार, आणि जोडीदाराची स्वप्ने हरपली…
अमळनेर:- इंदोर अमळनेर बस दुर्घटनेत अमळनेरातील पाच जणांच्या मृत्यूने संपूर्ण तालुका हळहळला असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तालुक्यातील पाडळसरे येथील अविनाश संजय परदेशी वय २४ हा चार दिवसापूर्वी लोकमान्य नगर, लालबाग इंदूर येथे मावशी मिनाबाई बुंदेला व लहान भाऊ अजयला भेटायला गेला होता. तेथेच काल रविवारी भाऊ अजयचा वाढदिवस साजरा करून सकाळी इंदूर अमळनेर बसने सरवटे बसस्थानकावर मावसभाऊ आदित्य गेंडालाल बुंदेला, अंकीत व अजय यांनी अविनाशला बसमध्ये बसवून परतले होते तसे आईला फोन करून सांगितले की अविनाशला अमळनेर बसमध्ये बसवले म्हणून पण काही वेळात अपघात घडला व सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्या आईला ही घटना कळताच अजयला फोन करून घटनास्थळी जायला सांगितल्याने अजय आणि अदित्यने खाजगी वाहनातून अपघातग्रस्त स्थळ गाठले तर त्यांच्या हाती अविनाशचा मृतदेहच आला. वडील बेपत्ता झाल्याने आई संगीताबाई हया लहानग्या अजय व अविनाशला वडील हिरालाल खैरनार यांच्याकडे गावी राहू लागले, अविनाशने गेल्या १० वर्षे आजोबांचा धोबी व्यवसाय सांभाळत परिसरातील ८ ते १० खेड्यात कपडे इस्त्री करून घरोघरी सेवा सुरू केल्याने तो पाडळसरे गावातील घराघरात व परिसरात परिचित होता .इंदूर अमळनेर बसच्या अपघातात अविनाशच्या मृत्यूची वार्ता कळताच गावावर शोककळा व स्मशान शांतता पसरली त्याच्या पश्चात वृद्ध आजी व अर्धांगवायू झालेले आजोबा, आई व लहान भाऊ असा परिवार आहे. अविनाशचा अपघात झाला आहे म्हणून सांगताच वृद्ध आजी आजोबांनी हंबरडा फोडून ल, आम्हाला व मुलीला आधार होता, तो गेल्याने आमचे सोडा माझ्या मुलीचे कसे होईल म्हणून टाहो फोडला, हे ऐकून जनसमुदायाच्या डोळ्यातून ही अश्रू तरळले. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथील निंबाजी आनंदा पाटील (वय 60 वर्ष) हे आपल्या मुलाला भेटायला इंदोर गेले होते. एक दिवस जावून त्याच गाडीने ते परत निघाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र ११ वाजता अचानक अपघाताचा निरोप आल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मागे पत्नी, 3 मुले, मुलगी जावई, नात नातवंडे असा परिवार आहे.
अमळनेर येथील झेनिथ जनरल स्टोर्स व बुरहानी जनरल स्टोर्स चे अलीभाई बुकवाला यांची मुलगी अरवा बोहरी यांचे इंदोर अमळनेर बस अपघातात निधन झाले. ती एस. के. बुकवाला साहेब,सुरभी कॉलनी, यांची पुतणी होय. त्यांचे माहेर अमळनेर व सासर मुर्तिजापूर येथील आहे.दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्या इंदोरला नानी कडे गेल्या होत्या तिकडून माहेरी अमळनेर येत होत्या. मात्र त्यांची माहेरची भेट ही अपूर्णच राहिली.
चालक चंद्रकांत एकनाथ पाटील हे मुडी-बोदर्डे ता. अमळनेर येथील जावई होते तर, त्यांचे वडील एकनाथ पाटील हे मांडळ आरोग्य केंद्रात, तसेच अमळनेर पं स मध्ये नोकरी निमित्ताने चांगले संबंध प्रस्थापित केले असल्याने मुडी – मांडळ परिसरातून हळहळ व्यक्त केला जात असून शोककळा पसरली आहे.
वाहक प्रकाश श्रावण चौधरी यांचा पश्चात पत्नी, मूलगा, मुलगी आई वडील, बहिणी, लहान भाऊ असा परिवार आहे. लहान भाऊ दिल्लीला सीआयएसएफ मध्ये उच्च पदावर कार्यरत असून काही दिवस पंतप्रधानांचे विशेष सुरक्षा पथकात होता. प्रकाश यांचे आई वडील दिल्लीला लहान भावाकडे होते. मुलाच्या मृत्यृची घटना कळताच विमानाने इंदोर व तेथून रात्री उशीरा अमळनेर पोहचणार होते.