
विविध बाबतीत मान्यवरांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन…
अमळनेर:- येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व अजित सीडस्, अदास्का इंडिया, ऍडवान्स पेस्टीसाईड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ रोजी खरीप हंगामात क्षेत्रीय किसान गप्पागोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आत्मा कमेटीचे अध्यक्ष सुनिल पवार हे होते. तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात कृषी विभागामार्फत केलेले खरीप हंगामाचे नियोजन, कृषि संजिवनी मोहिम, पिक संरक्षण मोहिमेअंतर्गत दि.२५ जुलै २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ नियोजन, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, महाडीबीटी योजना व प्रधानमंत्री पीक विमा योजना यांची अंतिम मुदत ३१ जुलै २०२२ असून तत्पूर्वी पीक विमायोजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. यावेळी सुनील मुळे, अजित सीडस् यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान विषयी सखोल मार्गदर्शन केले, कमलेश चव्हाण अड्व्हान्स पेस्टीसाईड यांनी कापूस मका व विविध पिकांचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन व जैविक कीड नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. तर विशाल भोर अदास्का इंडिया यांनी नविन उदयास आलेले नॅनो तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजाऊन सांगितले. तसेच पिकांचे एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मान्यवरांचे शुभ हस्ते पिक संरक्षण मोहिमेअंतर्गत कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी व मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण बाबत घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. सदर कार्यक्रमास तालुका शेतकरी सल्ला समितीचे सदस्य,प्रगतशील शेतकरी यांचे मनोगत व शंका समाधान करून मार्गदर्शन करण्यात आले. आत्मा अंतर्गत शेतकरी मित्र, शेतकरी गटाचे अध्यक्ष दिपक पाटील रा. वावडे तसेच तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रगतशील शेतकरी हिम्मतराव पाटील रा. मुडी यांनी मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांतर्फे कृषी विभागाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी सोनाली सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक प्रविण पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी तालुका तंत्र व्यवस्थापक आत्मा भूषण पाटील व कृषि विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.