मांडळ येथील घटना, कर्जबाजारी झाल्याने उचलले टोकाचे पाऊल…
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे ३५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना ३१ जुलै रोजी घडली आहे. सततची नापिकी व कर्जाच्या चिंतेत हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
डिगंबर संतोष पाटील (वय ३५) असे मयताचे नाव असून दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी ५ वाजता नेहमीप्रमाणे खळ्यात गुरांना चारापाणी गेले होते. सात वाजले तरी डिगंबर परत आला नाही हे पाहण्यासाठी मोठा भाऊ खळ्यात गेला असता डिगंबर हा खळ्यात असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. मोठ्या भाऊ व आजूबाजूच्या लोकांनी त्यास खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एएसआय राजेंद्र पाटील हे करीत आहेत. डिगंबर हा नुकताच विकासोवर बिनविरोध निवडून आला होता तसेच तो मनमिळाऊ व कष्टाळू स्वभावाचा असल्याने मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली जात आहे.