पीडित शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे देण्याची आमदारांनी केली मागणी…
अमळनेर:- मतदारसंघात 2019 साली अतिवृष्टी आणि 2021 साली गुलाबी वादळ व अतिवृष्टीमुळे मुळे असंख्य शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे होऊन शासन दरबारी दाखल झाल्यानंतर मागील शासनाने मंजुरी देऊनही हे शासन शेतकऱ्यांना ते पैसे देत नसल्याने ते त्वरित द्यावेत अशी आग्रही मागणी आमदार अनिल पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे केली.
राज्याचे विरोधी पक्षनेते ना अजित पवार, आ छगन भुजबळ, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह आमदारांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे राज्याच्या विविध प्रश्नांबाबत राज्यपालांची नुकतीच भेट घेतली. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर मतदारसंघातील विविध प्रश्न सादर करताना प्रामुख्याने नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने त्यावर राज्यपालांचे लक्ष केंद्रित केले. यावेळी त्यांनी सांगितले की अमळनेर मतदारसंघात सप्टेंबर 2019 मध्ये अतिवृष्टी झाल्याने असंख्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यानंतर 2021 साली गुलाबी वादळ आणि अतिवृष्टीमुळे अमळनेर तालुक्यातील 8 मंडल आणि पारोळा तालुक्यातील 2 मंडल या परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दोन्ही वेळा या नुकसानीचे पंचनामे होऊन अहवाल शासनाला सादर झाला. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी या दोन्ही प्रस्तावांना मान्यताही दिली मात्र या शासनाने मदत देण्याचा विषय स्थगित करून शेतकऱ्यांचे पैसे रोखून धरले आहेत,तरी आधीच पीडित असलेल्या शेतकऱ्यांना ते पैसे तातडीने अदा करावेत अशी आग्रही मागणी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमदार अनिल पाटील यांनी केली यावर राज्यपालांनी सकारात्मकता दर्शविली. तसेच विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळावा अशी मागणी विरोधीपक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांनी करत राज्याच्या विविध मागण्यांबाबतचे निवेदन मा. राज्यपालांना सादर केले. यावेळी माजी मंत्री मा. छगन भुजबळ, मा. हसन मुश्रीफ, कु.आदिती तटकरे, आ. अनिल पाटील, आ. नितीन पवार, आ.चंद्रकांत नवघरे, आ. सुनील भुसारा आदी नेते शिष्टमंडळात सहभागी झाले होते.