शहरातील देशमुख नगरातील घटना, धुळे येथे बालकावर उपचार सुरू…
अमळनेर:- पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी दोन वर्षांच्या बाळाला घरासमोरून उचलून नेऊन त्याचे लचके तोडल्याची घटना दिनांक ८ रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास देशमुख नगर मध्ये घडली.
देशमुख नगर मध्ये प्रांशु ओजस सूर्यवंशी (वय २ वर्षे) हा चिमुकला आपल्या घराच्या गेट मध्ये खेळत असताना अचानक दोन कुत्रे आले आणि त्याला ओढून नेऊन त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली. मुलगा रडायला लागताच त्याठिकाणी असलेल्या संगीता पवार यांना आवाज येताच त्यांनी धावत जाऊन बाळाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केल्याने बाळाचा जीव वाचला. त्याला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचार म्हणून बाळाला इंजेक्शन देण्यात आले. मात्र बाळाच्या अंगावर अनेक खोल जखमा झालेल्या असल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याने तसेच ए आर एस इंजेक्शन अमळनेर मध्ये उपलब्ध नसल्याने त्याला उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. तेथे त्याला जखमांजवळ ए आर एस इंजेक्शन देण्यात आल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. नगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांना जेरबंद करावे अशी मागणी पालकवर्गातून करण्यात येत आहे.