एका दिवसात १३० मिमी पावसाची नोंद, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- पातोंडा महसूल मंडळात पातोंडासह सावखेडा, दापोरी, मठगव्हाण, रुंधाटी, नांद्री, खवशी,जळोद परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीच्या मुसळधार पावसाच्या थैमानामुळे हजारो हेक्टरवरती शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवरती आस्मानी संकट कोसळले असून संपूर्ण पिके पाण्यात तरंगताना पाहुन बळीराजा अस्वस्थ झालेला आहे. कृषी व महसूल विभागाने पंचांनाम्याचे आदेश दिले असून तात्काळ पंचनामे करून मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यात अमळनेर तालुक्यातून पातोंडा परिसरात शंभर मिमीच्या वर पाऊस पडत आहे. रिमझिम पावसाने शेतामध्ये सर्वत्र तण वाढले होते. परिणामी मजुरांची टंचाई भासत होती. म्हणून सकाळ संध्याकाळ पर्यंत मजूर शेतामध्ये दिसून येत होते.उन्हाळा सारखे ऊन, उष्णतेच्या प्रचंड लाटा व घामाने नागरिक त्रस्त झाले होते. पावसाच्या विश्रांतीत शेतकऱ्यांना शेतीची मशागती करता आली. निंदणी, खत देणे,फवारणी करणे आदी कामात शेतकरी व्यस्त होते. यामुळे पिके हिरवीगार व बहार झालेली दिसत होती.पण सोमवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी पावसाने झोडपले आणि एका रात्रीत हजारो हेक्टर शेताशेतामध्ये पाणी साचले आणि संपूर्ण पिके पाण्याखाली गेली.बागायती कापूस, जिरायत कापूस, मूग, उडीद, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे,दुबार पेरणी, मशागती, खते, फवारणी, मजुरीसाठी मोठा खर्च केला असून आलेल्या या अस्मानी संकटाला तोंड कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे.
सुटवा नाल्याला पूर आल्याने संपूर्ण शेती पाण्याखाली…
सावखेडा शिवाराककडून पातोंडयाकडे सुटवा नाला वाहतो. गेल्या दोन तीन वर्षांपासून सुटवा नाला कोरडेठाक असायचा पण एका रात्रीत सुटवा नाला ओसंडून वाहू लागल्याने सुटवा नाला परिसरातील दूरदूर पर्यंत शेती पाण्याखाली गेली असून पिके तरंगताना दिसून येत आहे.बहुतेक शेतकऱ्यांचे बागायती कापूस असून शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
पातोंडयात घराची पडझड…
माहिजी देवी रोड परिसरात राहणारे भिका कुंभार यांच्या घराची भिंत पडल्याने घराचे नुकसान झालेलं आहे.रात्री झालेल्या मुसळधार पावसाने भिंत कोसळली परिणामी भिंत बाहेरील बाजूस पडल्याने मोठी जीवितहानी टळली. घरातील व्यक्ती घरात झोपले असल्याने भिंत घरातील आतील भागांत पडली असती तर जीवितहानी झाली असती.पण देव बलवत्तर म्हणून कुटुंब वाचले.झालेल्या नुकसानाचे पंचनामा होऊन मदतीची अपेक्षा कुटुंबाने केली आहे.