सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथून जवळच असलेल्या दहिवद येथे क्रांतीदिन व आदिवासी दिनाचे औचित्य साधत मोबाईल ई पीक पेरा नोंदणीला सुरवात करण्यात आली.
सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी कापूस, मका, मूग, उडीद, सोयाबीन व इतर पिके पेरली आहेत. शेतात पेरलेल्या पिकांची नोंद ही शासनाच्या कामी सातबारा वर असणे आवश्यक असते. ती नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठीच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या आणि बऱ्या प्रमाणात पीक पेरा नोंदी ह्या चुकीच्या पद्धतीने लावल्या जात होत्या.ही बाब शासनाच्या निदर्शनास येताच शासनाने ई-पीक मोबाईल अप काढून शेतकऱ्यांना ऑनलाईन पध्दतीने पीक पेरा नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली.ह्या सोयीमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून सु-सूत्रता देखील येणार आहे. ही नोंद शेतात जाऊन अक्षवृत्त व रेखावृत्त घेऊन केली जात असते. शेतकरी ही पीक विमे काढत असतात व दुष्काळजन्य परिस्थिती, पूर परिस्थिती व इतर कारणांमुळे शेतीच्या पिकांचे नुकसान झाले असल्यास त्याच्या शासकीय मदतीसाठी पीक पेरा नोंद आवश्यक असते.आता पातोंडा महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात गेली आहेत. पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले असून त्याआधी शेतकऱ्यांनी मोबाईल द्वारे ई-पीक पेरा नोंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.म्हणून दहिवद येथील कोतवाल प्रदिप देसले यांनी शेतकऱ्यांना शेतात जाऊन ई-पीक अँप कसे डाऊनलोड करून पीक पेरा नोंद कशी करावी याचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दिले. यावेळी शेतकरी पंकज पाटील,प्रविण जाधव, गणेश देसले, धर्मवीर पाटील, सुनील मगरे, रवींद्र माळी, महेश लोहार, राहुल माळी आदी उपस्थित होते.