तिरंगा चौकात हजारो नागरिक व विद्यार्थ्यांची उपस्थिती…
अमळनेर:- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने अमळनेरच्या इतिहासात प्रथमच पंधरा हजाराच्या वर नागरिकांनी पर्यावरण संरक्षणची सामूहिक शपथ घेत राष्ट्रगीत गात तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी शाळेकरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
देशात विविध ठिकाणी स्वातंत्र्याचे ७५ वर्ष विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट रोजी अमळनेर नगरपरिषदेतर्फे माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून पर्यावरण संरक्षणाची शपथ घेण्यात आली. विविध वार्ड भागात तसेच सामूहिक शपथ तिरंगा चौकात घेण्यात आली. याप्रसंगी तिरंगा चौक गर्दीने फुलून गेला होता. यावेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, स्मिता वाघ, माजी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसिलदार मिलिंद वाघ, पो. नि. जयपाल हिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील यांच्यासह विविध शासकीय निमशासकीय कर्मचारी, विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, जनसमुदाय यांच्यासह पंधरा हजारावर उपस्थिती देत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.