शेकडो विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेसंदर्भात केले सखोल मार्गदर्शन…
अमळनेर:- यूपीएससीची जनजागृती करण्यासाठी “वारी यूपीएससीची” या उपक्रमास येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुलमधून सुरुवात करण्यात आली. या वारीत “स्पर्धा परीक्षेच्या ग्रंथ दिंडीने” सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. ग्रंथ दिंडीचा भार “आयएएस” अभिजीत पाटील व “आयपीएस” देवराज पाटील यांनी आपल्या खांद्यावर उचलून “वारी यूपीएससी”ची या उपक्रमाला जिल्ह्यातून सुरुवात केली. विशेष म्हणजे मान्यवरांनी गांधी टोपी परिधान करून जनजागृती चा संदेश देत तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेसंदर्भात सखोल मार्गदर्शनाची सकारात्मक पेरणी केली.
अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये उपक्रमचे उद्घाटन पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील अध्यक्षस्थानी होते. उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड, गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी पि डी धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना वाडीले, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस जे शेख, बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी पी चौधरी, आर्मी स्कुलचे प्राचार्य पी एम कोळी, सुभेदार मेजर नागराज पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शुभांगी चव्हाण, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य सुदीप पाटील, निवृत्त मुख्याध्यापक एस.डी.देशमुख, माजी सरपंच नरेंद्र पाटील, वाळकी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, विजयसिंग पवार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी “आयएएस” अभिजीत पाटील, “आयपीएस” देवराज पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ.तुषार देशमुख यांची नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथ दिंडी व वृक्ष दिंडीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून दिंडीला सुरुवात करण्यात आली. यावेळी वृक्षारोपण ही करण्यात आले. या दिंडीत आर्मी स्कूल, आयटीआय कॉलेज, बीएड कॉलेज, कृषी महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय तसेच फागणे येथील स्पर्धा परीक्षा केंद्राचे विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. पी.एम. कोळी यांनी प्रास्ताविक केले. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. गोपाल हडपे यांनी आभार मानले.
वारी गुरूवारी जळगावला पोहचणार
आज (ता.१७) चाळीसगांव येथे सकाळी दहाला राष्ट्रीय विद्यालयात व पाचोरा येथे दुपारी अडीचला एम एम कॉलेज येथे मार्गदर्शन करण्यात आले. तर उद्या अर्थात गुरुवारी (ता.१८) रोजी जळगांव येथे सकाळी दहाला नूतन मराठा कॉलेज तर मुक्ताईनगर येथे अडीचला संत मुक्ताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी वारीचे नियोजन करण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या वारीत सहभागी होवून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.