प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनाबाबत दिली माहिती…
अमळनेर:- येथील मंगळग्रह मंदिरात कृषी विभागाच्या वतीने तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
दि.२४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तथा आत्मा व मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत कृषी प्रक्रिया जनजागृती पंधरवाडा १५-३१ ऑग २०२२ निमित्त तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रानभाज्या महोत्सवाचेही आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आत्मा समिती अध्यक्ष सुनील पवार होते. सदर कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर, समाधान पाटील, जिल्हा संसाधन व्यक्ती PMFME जळगाव हे प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी भरत वारे यांनी केले. यावेळी अमळनेर तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी, आत्मा अंतर्गत शेतकरी गट, मविम महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, राष्ट्रीयीकृत बँक व्यवस्थापक, महिला लघु उद्योजक शेतकरी, रिसोर्स फार्मर कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात समाधान पाटील यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना अंमलबजावणी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यशाळेत ३५ वैयक्तिक शेतकरी व महिला शेतकरी गटांचे अर्ज नाव नोंदणी करण्यात आली. तसेच सदर गटांना कर्ज पुरवठा करणे बाबत उपस्थित राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापक व जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी सखोल मार्गदर्शन करून शंका निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी अविनाश खैरनार यांनी केले. यावेळी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सदर रान भाजी महोत्सवामध्ये तालुक्यातील 35 महिला शेतकरी बचत गट व प्रगतशील शेतकरी तसेच ॲग्रोटेक हेड फार्मर प्रोड्युसर कंपनी अमळनेर यांनी रानभाज्यांचे प्रदर्शन व त्यांचे आहारातील महत्त्व तसेच विविध पाककृती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी रानभाज्या महोत्सवास १५० ते २०० शेतकऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली व सदर कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.