संचालकांनी सकारात्मकता दाखवत प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन…
अमळनेर:- राज्यात सद्यस्थितीत १९ जिल्ह्यातील सैनिकी शाळेत आदिवासी तुकडीवर सुमारे ३०० शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांच्या वेतनासाठी यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतूद निधींपैकी ५० टक्के निधी त्वरित वितरित करावा, तसेच लेखाशीर्ष अनिवार्य करावे यासाठी राज्य सैनिकी शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाने माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे राज्य शिक्षण संचालक महेश पालकर यांना साकडे घातले.
यंदाच्या अर्थसंकल्पात या शिक्षकांच्या वेतनासाठी २५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत यापैकी ५० टक्के वेतन निधी खर्ची झाला आहे. उर्वरित ५० टक्के अर्थात १२ कोटी ५० लाख रुपयांचा वेतन निधी लवकरात लवकर वितरित करावा, तसेच २२०२ एच ९७३ हे लेखाशीर्ष प्लॅन टू नॉन-प्लॅन अर्थात अनिवार्य करावे, अन अनियमित पगाराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावे, या आशयाचे निवेदन कृती समितीचे राज्य समन्वयक उमेश काटे, आर ए घुगे, नायब सुभेदार बी पी पाटील, प्राचार्य पी एम कोळी, जी. पी.हडपे, टी. के.पावरा, शिवाजी पाटील यांनी माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर यांना दिले. श्री.पालकर हे एका महाशिबिराच्या कार्यक्रमानिमित्त अमळनेर (जि.जळगाव) येथे आले होते. पालकर यांच्याशी वेतन निधी बाबत सविस्तर चर्चाही करण्यात आली. याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.