न्यु अशोकदादा भालेराव नगरातील नागरिकांचे हाल…
अमळनेर:- ऐन पावसाळ्यात भुयारी गटारींच्या कामाला मुहूर्त सापडला असून शहरातील न्यु अशोकदादा भालेराव नगरात नागरिकांनी ससेहोलपट होत आहे.
पावसाळ्यात जागे झालेल्या ठेकेदाराने नगरपालिकेच्या तोंडात बोळा कोंबून मनमानी पद्धतीने काम सुरू केले असून संबंधित अधिकारी डोळे मिटून असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या कामामुळे व पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला असून घरापूढे रस्त्यावर चालण्यास जागा शिल्लक नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थी, पादचारी व ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. ऐन पावसाळ्यात अवेळी चांगले रस्ते फोडून भूयारी गटारीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला नगरपरिषदेचा आर्शिवाद असून त्यामुळे हा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. याप्रकरणी नपच्या अधिकाऱ्यांनी त्वरित भूमिका घेवून कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.