पोलिसात नऊ जणांविरुद्ध विनयभंगासह विविध गुन्हे दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील तरवाडे येथे मागील वादातून जोरदार हाणामारी झाली असून दोन महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार मारवड पोलीसात देण्यात आली आहे.
याबाबत तरवाडे येथील विजय सदाशिव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ संदीप याने खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्या रागातून ३ सप्टेंबर रोजी शरद व विनोद पवार यांनी संदीप याची पत्नीस अडवत आमच्याविरुद्ध केलेले गुन्हे मागे घ्या, नाहीतर जिवंत सोडणार नाही असे सांगत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानतंर सदर महिलेने घडलेला प्रकार घरी सांगितला. तोपर्यंत त्यांच्या घरासमोर विनोद सुकदेव पवार, नितीन उखा पवार, रूपाबई उख पवार, शरद उखा पवार, उखा बुधा पवार, विमलबाई उखा पवार सर्व रा. तरवडे तसेच रातीलाल रामलाल पाटील, हर्षल रतीलाल पाटील व प्रमोद रतीलाल पाटील रा. पिंपळे हे लाठ्या काठ्या, लोखंडी रॉड व पेट्रोल घेवून जमा होत यांना जिवंत सोडणार नाही असे म्हणत फिर्यादीची आई व वहिनी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी व त्याचा भाऊ संदीप यास लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत मिरची पावडर ही फेकले. संदीप यास लोखंडी रॉडने छातीवर व लाकडी दांड्याने डोक्यावर गंभीर दुखापत करण्यात आली. भांडण आवरण्यासाठी आलेल्या सतीश नागराज पाटील याला देखील मारहाण करण्यात आली. त्यानतंर गावातील लोकांच्या मदतीने संदीप व सतीश यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. संदीप यास आयसीयु मध्ये दाखल करण्यात आले असून तो अद्याप शुद्धीवर आला नसल्याचे नमूद केले आहे. त्यावरून वरील नऊ जणांविरुद्ध भादवि कलम ३०७, ३५४, ३४१, १४३, १४४, १४८, १४९, ३२३, ५०६ व म.पो. अधिनियम ३७(१), ३७(३), १३५ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि जयेश खलाने हे करीत आहेत.