कापसावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाबाबत केले मार्गदर्शन…
अमळनेर:- तालुक्यातील टाकरखेडा येथे दि. 2 सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्य पुरस्कृत कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास अंतर्गत प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेब कुंभार यांच्या शेतात शेतीशाळा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.
गुलाबी बोंड अळी नियंत्रण साठी फरोमोन सापळ्यांचा वापर, बोंडअळीग्रस्त डोमकल्या नष्ट करणे, शेतात पक्षीथांबे लावणे,5% निंबोळी अर्काचा फवारणीसाठी वापर करणे, बेव्हरिया बासियना, व्हर्टीसेलियम लेकऍनी यासारख्या मित्र बुरशीचा वापर करणे अशा प्रकारे जैविक पदधतीने नियंत्रण करण्याचे मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक प्रविण पाटील यांनी केले. कापसाची फरदड न घेता हंगाम संपल्यानंतर पऱ्हाट्या पासून कंपोस्ट खत तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच गरजेनुसार क्विनालफोस 25EC 2 मिली किंवा प्रोफेनोफोस 50EC 2 मिली किंवा थायोडिकार्ब 75WP 2 ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथिन 5EC 1मिली किंवा सायपरमेथरिन 10EC 1 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून या रासायनिक कीटनाशकांचा वापर क्रमाने करण्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी लघु उद्योगांना बळकटीकरनासाठी 35% अनुदान असलेली PMFME योजनेत सहभागी होण्याचे व पिएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन उपस्थीतांना करण्यात आले. यावेळी राशी सीडस कंपनीचे प्रतिनिधी श्री भूषण गोसावी उपस्थीत होते. राशी सिडस कडून कार्यक्रमात काही प्रमाणात फेरोमोन सापळ्यांचे वाटप करण्यात आले. सदर शेतीशाळेला ज्येष्ठ शेतकरी ह.भ.प. कैलास महाराज महाले, मनोहर पाटील, गुलाब पाटील, गोरख कुंभार, भगवान कोळी, निंबा पाटील यांच्या सह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.