सहसचिव पदावर अमळनेर येथील सचिन पाटील यांची निवड…
अमळनेर:- महाराष्ट्र राज्य डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनची राज्यस्तरीय मीटिंग दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी पुणे येथे शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती.
सदर या संघटनेच्या अध्यक्षपदी पारनेर मतदार संघाचे विद्यमान आमदार निलेश लंके यांची व उपाध्यक्षपदी क्रीडा क्षेत्रातील विविध संघटनांची पदे भूषविणारे धुळे येथील प्रा. बाबा बाविस्कर यांची तसेच सचिव पदावर रायगड जिल्ह्यातील शरद कदम तर सहसचिव पदावर अमळनेर येथील सचिन पाटील निवड करण्यात आली. जळगाव जिल्ह्याच्या वतीने, आणि चोपडा येथील प्रताप विद्या मंदिराचे क्रीडाशिक्षक नरेंद्र एन. महाजन सर यांची महाराष्ट्र राज्याच्या पंच मंडळावर सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील तीनही निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांसमवेत इतर पदाधिकाऱ्यांचा नवनियुक्त अध्यक्ष विद्यमान आमदार निलेशजी लंके यांच्या हस्ते याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच उत्तर महाराष्ट्रात डायरेक्ट हॉलीबॉल खेळासाठी कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास आपण सदैव त्यांच्यासोबत असल्याची भावना याप्रसंगी आमदार निलेशजी लंके यांनी बोलून दाखवली व लवकरच ते जळगाव जिल्हा व धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची घोषणा देखील याप्रसंगी केली. शरदजी कदम यांनी याप्रसंगी डायरेक्ट हॉलीबॉल खेळाच्या अटी व नियम या विषयावर सखोल मार्गदर्शन व चर्चा करीत विविध समित्या व कार्यकारणी जाहीर केल्या. तसेच संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित आणून महाराष्ट्र राज्याचे कार्यकारणी ही यशस्वीरित्या भविष्यात होणाऱ्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय,राष्ट्रीय स्तरावरील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांना उत्तमपणे पार पाडून या खेळाला मोठा नावलौकिक मिळवून देण्याचा विश्वास आपल्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमात निवड झालेल्या नवनियुक्त अध्यक्ष आमदार निलेश लंके, सचिव शरदजी कदम व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे अखिल भारतीय डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे भारतीय अध्यक्ष विपिनजी चहल यांच्या वतीने भारतीय उपाध्यक्ष प्राध्यापक बाबा बाविस्कर यांनी मनस्वी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर राज्यस्तरावरील या सभेसाठी महाराष्ट्र राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती संघटनेसाठी अतिशय जमेची बाजू असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हसत खेळत सभा पार पडली.