सेवा सुरळीत न झाल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागणार…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल ची सेवा सर्वदूर ग्राहकांना टेलिफोन व मोबाईलच्या माध्यमातून देशाच्या काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत होती. आणि आजच्या स्पर्धात्मक डिजिटल युगात बीएसएनएलची सेवा कही खुशी कही गम सारखी ग्राहकांना मिळत असून त्या सेवेवर मोबाईल ग्राहकांची प्रचंड नाराजी व रोष बीएसएनएलची सेवा देणाऱ्या कंपनीवर होताना दिसून येत आहे.आणि अशा परिणामामुळे बीएसएनएल आज नामशेष होण्याच्या मागावर आहे.
पातोंडा हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असून ह्याठिकाणी दळणवळणाच्या सर्व सुविधा आहेत. पातोंडा परिसरात मोबाईल धारकांची संख्या अगणित असून बीएसएनएल, आयडिया,एअरटेल,वोडाफोन आयडिया दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपनीचे ग्राहक आहेत. आणि ग्राहकांना सेवा व आकर्षक योजना देण्यावरून सदर कंपन्यामध्ये चढाओढ असते. आणि यावरून ग्राहकांची पसंती ठरवली जाते. अशा परिस्थितीतही काही मोबाईल ग्राहक बीएसएनएल कंपनीवर विश्वास ठेवत त्यांची सेवा वापरत आहेत.मात्र महागडे मोबाईल रिचार्ज प्लॅन करूनही ग्राहकांना नेटसेवा सुरळीत मिळत नाही आहे. मोबाईल वापरणारे ग्राहक व वर्क फ्रॉम होम करणाऱ्या ग्राहकांना देखील ह्या अखंडित नेटसेवेचा परिणाम भोगावा लागत असून आर्थिक भुर्दंड सहित मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इतर दूरसंचार कंपन्यांचे नेटसेवा सुरळीत व जलद मिळत असून मात्र बीएसएनएलची सेवा अखंडीत व धीम्या गतीने मिळत आहे. अशा परिस्थितीमुळे बीएसएनएलचे ग्राहक इतर कंपन्याच्या सेवेकडे वळतात. जर बीएसएनएल च्या अधिकाऱ्यांनी पातोंडा परिसरात बीएसएनएलची नेटसेवा सुरळीत न केल्यास पातोंडयातील युजर्स ग्राहक न्यायालयात धाव घेणार आहेत.