ग्रा.पं.कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील माहिजी देवी मंदिर रोडकडील वास्तव्यास असलेल्या मांग गारुडी समाजाच्या दलित वस्तीत दोन महिन्यापासून अंधार असून दोन महिन्यांपासून सार्वजनिक पथदिव्याचा लाईट अजूनपर्यंत लावला न गेल्याने ग्राम पंचायतीच्या कारभारावर वस्तीतील रहिवाशांनी प्रश्नचिन्ह उभे केले असून जाणीवपूर्वक ग्राम पंचायत आमच्या वस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपदेखील होताना दिसून येत आहे.
पातोंडा येथे बस स्टॉप परिसर,पारधी वाडा,न्यू प्लॉट व माहिजी देवी मंदिर रोड अशा ठिकाणी दलित वस्त्या आहेत. माहिजी देवी रोड परिसरात मांग गारुडी समाजाची वस्ती आहे. काही कुटुंबे कामानिमित्त बाहेरगावी येत-जात असतात तर काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. ह्या समाजातील दलित वस्ती अजूनही मूलभूत गरजापासून आजही वंचित आहेत. ना त्यांना सार्वजनिक नळाची उपलब्धता आहे. ना गटारींची, ना स्वच्छतेची, ना घरकुलांची, ना शौचालायची. कायमच ह्या दलीतवस्तीकडे ग्राम पंचायतीचा कानाडोळा असतो. शासन स्तरावरून दलित वस्तीच्या उध्दारासाठी विशेष निधी दिला जातो.त्याचप्रमाणे ग्राम पंचायत कराच्या दहा टक्के हा दलित वस्तीसाठी खर्च करण्याची तरतूद असताना देखील आजपर्यंत ह्या वस्तीत कुठलाच दलित वस्ती निधीचा विनियोग झालेला दिसून येत नाही. दलित वस्ती निधीचा इतर केवळ विशिष्ट दलित वस्तीत वेगळ्या कारणासाठी खर्च केला जातो.मात्र इतर दलित वस्त्या आजही उपेक्षित आहेत. मांग गारुडी समाजाच्या वस्तीतील नागरिकांना आजही पाण्यासाठी रोजनिशी भटकंती करावी लागत आहे.काही कुटुंबे घरकुल योजनेपासून वंचित आहेत. काहींना राहण्यासाठी जागाही उपलब्ध नाही.महिलांना उघड्यावर शौचालयास जावे लागते. जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणी नाही. अशा अनेक मूलभूत घटकांपासून ती वस्ती आजही वंचित आहे. गेल्या दोन महिन्यापासून तेथील वस्तीतील सार्वजनिक विदुयत दिवा बंद असून वस्ती अंधारमय काळोखात जीवन व्यथित करीत आहे. लोकप्रतिनिधी केवळ मतदान मागण्यापुरताच वस्तीत भेट देत असतात आणि नंतर ढुंकूनही बघायला येत नसल्याने त्यांच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत.निवडून दिलेले सदस्य ही वस्तीत येत नसून त्यांना आमच्या समस्या व तक्रारी कशा कळतील. शासनाच्या दलित वस्तीच्या सुधारणासाठी अनेक योजना असून मात्र आमच्या वस्तीला कायमच उपेक्षित ठेवलं जातं असून कोणताच दलित वस्तीचा निधी आजपर्यंत आमच्या वस्तीत खर्च केला गेला नाही. पाण्यासाठी भटकंती करावी लागत असते.महिना-महिना सार्वजनिक लाईट टाकला जात नाही. कोणत्याच सुविधा दिल्या जात नसल्याने सदर वस्तीतील रहिवाशांमध्ये ग्राम पंचायत कारभाराविषयी प्रचंड रोष आहे. आमच्या वस्तीत जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणी करून मिळावी. पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीची व्यवस्था करून द्यावी.सार्वजनिक शौचालायची व्यवस्था करून द्यावी.गटारींचे बांधकाम करून मिळावे अशा मागण्यासह कमीतकमी आमचा हक्काचा दलित वस्तीचा निधी आमच्या वस्तीत खर्च करून आमचे जीवनमान उंचावण्यासाठी आतातरी ग्राम पंचायतीने योग्य ती पाऊले उचलावीत अशी मागणी सदर मांग गारुडी समाजाच्या दलित वस्तीतील रहिवाशांमधून होताना दिसून येत आहे.