नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्देशातून आयोजन…
अमळनेर:- नवोदित कवींनी जुन्या कवींची पुस्तके वाचावीत. त्या पुस्तकांची पारायण करावेत. अभ्यास करावा. कवींनी संख्या वाढवण्यापेक्षा कसदार अन दमदार लिखाण करणे गरजेचे आहे. कविता हे जगण्याचे बळ देते, ताकद देते, ऊर्जा देते तसेच कवीला पैसा देखील मिळवून देतो, असे मत कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक तथा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कृष्णा पाटील यांनी व्यक्त केले. खानदेश साहित्य संघ (अमळनेर शाखा) तर्फे झालेल्या एकदिवशीय “खुले बहुभाषिक रिमझिम कवी संमेलन”च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक तथा सीए नीरज अग्रवाल यांच्या हस्ते काव्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष तथा कवी रमेश पवार, प्रताप महाविद्यालयातील मराठी विभाग चे प्रमुख प्रा. डॉ. रमेश माने, प्रा बी एन चौधरी, खान्देश साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, तालुकाध्यक्ष सुनीता पाटील आदी उपस्थित होते. कवी संमेलनासाठी जळगाव, धुळे नंदुरबार तसेच खान्देश बाहेरून देखील सुमारे ५० नवोदित कवी साहित्यिक उपस्थित होते. हे कवी संमेलन ५ सत्रात झाले यात सत्राचे संमेलनाध्यक्ष म्हणून डी ए धनगर, अनिता बोरसे, छाया इसे, उमेश काटे व गोपाल हडपे यांनी भूमिका पार पाडली, तर सत्राचे निवेदक म्हणून दत्तात्रय सोनवणे, मनोहर नेरकर, रेखा पाटील, जयश्री पवार, चंद्रकांत पाटील यांनी काम पाहिले. यावेळी बहुभाषिक अहिराणी, मराठी व हिंदीतून ही कविता, गझल यांची दर्जेदार मांडणी नवोदित कवींनी करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी निवृत्त पोलीस निरीक्षक हिरामण कंखरे, डॉ पराग पाटील, भाऊसाहेब देशमुख, रामकृष्ण बाविस्कर, रत्नाकर पाटील, वाल्मिक मराठे-पाटील, दत्तात्रय ठाकरे, रवींद्र पाटील, अजय भामरे, नूतन पाटील, वैशाली बोरसे, माधव खलानेकर आदी उपस्थित होते. नीरज अग्रवाल म्हणाले की, सद्यस्थितीत प्रताप महाविद्यालयात २८ हजार पेक्षा जास्त पुस्तके आहेत, मात्र मोबाईल मुळे वाचन संस्कृती दूर गेली आहे. अनेकजण मोबाईलवर इतरांचे स्टेटस बघण्यातच स्वतःचे स्टेटस कमी करीत असल्याची खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ रमेश माने म्हणाले की, कविता या अक्षर सुधारण्यासाठी नसून भाव-भावना व्यक्त करण्यासाठी असतात. डॉ अविनाश जोशी म्हणाले की, विविध साहित्य क्षेत्रातील लोकांनी एकत्र आल्यास तालुक्यात आगामी काळात “सांस्कृतिक खानदेश महोत्सव” भरविणार असल्याचे संकेत दिले. रमेश पवार यांनी सांगितले की, सर्वांनी मरगळ दूर करून एकत्र येत हे काव्य संमेलन यशस्वी करून दाखवले ही अभिमानास्पद बाब आहे. डॉ. कुणाल पवार अध्यक्ष यांनी सांगितले की, नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्देश ठेऊन कवी संमेलन घेतले. “जेष्ठांना मान, नवोदितांचा प्रोत्साहन” ही संकल्पनेला पुढे नेत असल्याची माहिती दिली. संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाध्यक्ष सुनीता पाटील यांनी आभार मानले.