शिबिराच्या नियोजनासाठी आज मंगळग्रह मंदिरात बैठक…
अमळनेर:- येथील मंगळग्रह सेवा संस्था व राज्यात आरोग्य सेवेसाठी कार्यरत असलेली रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २९, ३० व ३१ ऑक्टोबर रोजी मंगळग्रह मंदिर येथे भव्य आरोग्य महाशिबिर होणार आहे. या शिबिरात येणाऱ्या योग्य त्या रुग्णांना लाखो रुपये खर्चाचे विविध उपचार व शस्त्रक्रिया मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयांतून मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर काही उपचार व शस्त्रक्रिया नाममात्र दरात होतील. शिबिरात येणाऱ्यांसाठी जात, धर्म व उत्पन्नाची कोणतीही अट नसेल.
सदर शिबिराच्या नियोजनासाठी रविवार, दि. २ ऑक्टोबर रोजी मंगळग्रह मंदिर येथे दुपारी साडेतीन वाजता बैठक आयोजित केली आहे. तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, सरपंच, वि. का. सोसायटीचे चेअरमन, सचिव, रोटरी क्लब, लायन्स क्लब, पत्रकार, सर्व आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकारी यांना निमंत्रणे पाठविली आहेत. ज्यांना निमंत्रणे मिळाली नसतील त्यांनी हेच निमंत्रण समजून बैठकीस उपस्थित राहावे, असे विनंती वजा आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेने केले आहे.