अमळनेर:- तालुक्यातील शिरूड गावात ऑगस्ट क्रांती दिवस व आदिवासी दिन ध्वजवंदनाने साजरा करण्यात आला.
क्रांती दिवस व आदिवासी दिन याचे औचित्य साधत शिरूड येथील श्री दत्त सार्वजनिक वाचनालयात मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ध्वजारोहणाचा मान निवृत्त सैनिक अनिल बाविस्कर यांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. यावेळी दत्त सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी ध्वजाला सलामी दिली. तसेच राष्ट्रगीत झाले. डी ए धनगर यांनी 9 ऑगस्ट 1942 अर्थात ऑगस्ट क्रांतीच्या आठवणी जागृत केल्या. अमळनेर शहरात त्याकाळी क्रांतिविरांगणा लीलाताई पाटील व क्रांतिसिंह उत्तमराव पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर कशा पद्धतीने इंग्रजांचा प्रतिकार केला तसेच चिमठाणा खजिनालुटीचा प्रसंग सांगितला. त्याच पद्धतीने अमळनेर मधील जाळलेले पोस्ट ऑफिस तहसील कार्यालय आणि त्यांच्या समवेत स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले अनेक मान्यवरांच्या स्मृती जागवल्या. तसेच इंग्रजांनी केलेला, बेछुटपणे, अनन्वित अत्याचार व छळ किती भयंकर होता, याविषयी सोदाहरण सांगितले. आज मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शहिदांच्या बलिदानाला सलाम करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी निवृत्त सैनिक अनिल बाविस्कर व रामभाऊ पाटील यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. आदिवासी बांधव यांचा प्रतिनिधी म्हणून गावचे सरपंच गोविंदा सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावकरी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी भारत माता की जय, वंदे मातरम म्हणून परिसर दणाणून सोडला. यावेळी सर्व उपस्थितांना शपथ शशिकांत पाटील यांनी दिली. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी जयवंतराव पाटील, भाऊसाहेब पाटील, विनायक पाटील, गुलाबराव पाटील, आनंदराव पाटील, सुकलाल पाटील, दत्तात्रेय बोरसे, भालेराव पाटील, रामलाल पाटील,दिलीप पाटील,शरद पाटील, विनोद बोरसे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.