५३ वर्षीय उषाबाईंचा तात्काळ उपचार न मिळाल्याने मृत्यू…
पर्यायी रस्त्यासाठी किती बळी घेणार ? ग्रामस्थांचा संतप्त सवाल…
अमळनेर:- तालुक्यातील सात्री येथे ५३ वर्षीय महिलेला तात्काळ उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रशासकीय अनास्था व समन्वयाने हा दुसरा बळी घेतला आहे.
सात्री गावातील ५३ वर्षीय उषाबाई रामलाल भील यांना ५ रोजी पहाटे ३ वाजता छातीत दुखणे व उलट्या येवू लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. मात्र बोरी नदीला पाणी असल्याने कुटुंबियांना बैलगाडी वा वाहनाने अंधारात नेता आले नाही. दिवस उजाडेपर्यंत त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानतंर त्यांना झोळी करून नदी पार करत अमळनेरात नेण्यात आले. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त होऊ लागला. महेन्द्र बोरसे व ग्रामस्थांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याचे ठरविल्यानंतर तहसिलदार व प्रांतांनी रुग्णालय गाठत त्यांची समजूत काढली. तसेच उपजिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे करून देत १२ रोजी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बोट डोक्यावर मिरवण्यासाठी आणली का ?
मागील वर्षी चिमुकल्या आरुशीच्या मृत्यू नंतर प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था म्हणून बोटीची व्यवस्था केली होती. तसेच अधिकाऱ्यांनी त्यावर जलपर्यटन करत सात्री गावाच्या फेऱ्या मारल्या होत्या. मात्र ह्या पावसाळ्यात ती बोट पुन्हा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्याचे सोडून १७ किलोमीटर दूर नगरपालिकेत ठेवण्यात आल्याचे समजते. आपत्कालीन परिस्थितीत बोट ग्रामस्थांच्या उपयोगी पडत नसेल तर ती डोक्यावर मिरवण्यासाठी आणली आहे का ? असा सवाल अनेकांनी केला आहे.
तालुका प्रशासनाचे नियोजन शून्य असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट…
मागील वर्षी ही बैठका घेवून प्रशासनाने वेळ मारून नेली होती. पर्यायी रस्त्याची पाहणी केली मात्र त्यावर कार्यवाही शून्य आहे. घटना घडून गेल्यावर जाग येणे ही नित्याचीच बाब झाली असून प्रशासकीय अनास्थेने हा दुसरा बळी घेतला आहे. सात्री गावाचे पुनर्वसन ही होत नाही आणि पर्यायी रस्ता ही मिळत नाही तसेच आपत्कालीन व्यवस्थापनाच्या नावाखाली तालुका प्रशासनाचे नियोजन शून्य असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.