नाशिक येथील एकाविरुद्ध अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल…
अमळनेर:- चारचाकी घेण्याच्या व्यवहारातून तीन लाखात फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक येथील इसमाविरुद्ध अमळनेर पोलीसात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील फिर्यादी सुनील चव्हाण यांची नाशिक येथील समीर सर्जेराव पाटील यांच्याशी मित्रमार्फत ४ वर्षापासून ओळख झाली होती. १० महिन्यापूर्वी समीर याने फिर्यादीला स्विफ्ट डिझायर गाडीचे फोटो टाकून गाडी विकायची आहे असे कळविले. तसेच तीन लाख रुपये किंमत ठरवून ६ नोव्हेंबर २०११ रोजी फिर्यदिने दोन लाख रुपये बयाना रक्कम बँकेत जाऊन जमा केली. ८ नोव्हेंबर रोजी समीर याने पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केल्याने मित्र असल्याच्या विश्वासाने फिर्यादीने पुन्हा एक लाख रुपये बँकेत जमा केले. समीर याने गाडीवरील बोझा कमी करून गाडी देतो, अडचण आली होती असे बोलून वेळोवेळी गाडी देण्यास टाळाटाळ केल्याने अमळनेर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असून भादवी कलम ४२० अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास हे कॉ. सुनील हटकर हे करीत आहेत.