जळगाव येथील नोबेल फाउंडेशन तर्फे अभ्यास दौऱ्याचे आयोजन…
अमळनेर:- येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजचे उपक्रमशील शिक्षक उमेश प्रतापराव काटे व पिंगळवाडे (ता.अमळनेर) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक दत्तात्रय बारकू सोनवणे या दोन्ही शिक्षकांची नोबेल फाउंडेशन (जळगाव) तर्फे “इस्रो विज्ञान अभ्यास दौरा” साठी निवड करण्यात आली आहे. याबाबत नोबेल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जयदीप पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात गोडी निर्माण व्हावी यासाठी हे शिक्षक कार्य करीत आहेत. तसेच विविध उपक्रम व प्रकल्पांच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांसाठी आदर्श शिक्षक म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल नोबेल फाउंडेशन (जळगाव) घेत त्यांची विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली आहे. हा विज्ञान अभ्यास दौरा १९ डिसेंबर २०२२ ते २२ डिसेंबर २०२२ दरम्यान होणार आहे. या अभ्यास दौऱ्यात ते विविध उच्च शिक्षण संस्थांना भेटी देणार आहेत. यात इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गांधीनगर (IIT), फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (PRL) अहमदाबाद , रिजनल सायन्स सेंटर अहमदाबाद , सायन्स सिटी अहमदाबाद यासारख्या संस्थांचा समावेश आहे. त्यांच्या निवडीबद्दल माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, नवलभाऊ प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ नितीन बच्छाव, गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण, प्रभारी गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी पी.डी. धनगर, माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, एरंडोलचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन आदींनी अभिनंदन केले आहे.