
संस्थाचालकांची निवडणूक बिनविरोध करण्याचा घेतला निर्णय….
अमळनेर:- विद्यापीठ विकास मंचच्या वतीने येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील संस्था चालकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रमुख उपस्थिती म्हणून खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे उपस्थित होते. यावेळी मंचावर खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे, विद्यापीठ विकास मंचचे दिलीप पाटील, बिभाग प्रमुख नितीन ठाकूर यांची उपस्थिती होती.

या सहविचार सभेची सुरूवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. स्वागतपर मनोगत खा. शि. मंडळाचे संचालक सी.ए. निरज अग्रवाल यांनी व्यक्त केले. संस्थेच्या वतीने सर्व उपस्थित संस्था चालकांचे स्वागत करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक नितीन ठाकूर यांनी केले. सभेत नवीन शैक्षणिक धोरणाबाबत प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, संस्था चालकांनी आताच जागृत होऊन नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सज्ज व्हावे. आपल्या संस्थेतील विद्यार्थी हा आपल्या देशाची धुरा आहे. या सभेत उपस्थित संस्था चालकांनी आपल्या समस्या व सुचना मांडल्या. यात पुनम गुजराथी, डॉ. महेश घुगरी, प्रभाकर चव्हाण, राजगोपाल भंडारी, निशांत रंधे, अनिल चौधरी, व्ही. टी. जोशी, सुधीर जाधव, संजय शिसोदे, प्रा. आर. व्ही. पाटील या संस्था चालकांनी चर्चेत सहभाग घेतला. आगामी अधिसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ विकास मंचचे दिलीप दादा पाटील यांनी विद्यापीठ प्राधिकरण संरचना यांची मांडणी केली. सदर निवडणूक बिनविरोध करण्यात यावी असे जाहीर आवाहन विद्यापीठ विकास मंचचे दिलीपदादा पाटील यांनी केली. त्यानंतर झालेल्या चर्चेत सर्व सदस्यांनी आगामी निवडणूक एकत्रितपणे बिनविरोध करण्यासाठी संमती दर्शवली. या सहविचार सभेस खा.शि. मंडळाचे सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन दिनेश नाईक व आभार प्रदर्शन योगेश मुंदडे यांनी केले.







