एकूण १९६ जणांनी घेतली माघार, अंतुर्ली व चोपडाई बिनविरोध…
अमळनेर:- तालुक्यातील २४ गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यापैकी २ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या होत्या. काल माघारीच्या दिवशी अंतुर्ली व चोपडाई ह्या दोन ग्रामपंचायती देखील बिनविरोध झाल्या असून कोंढावल येथे फक्त सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.
एकूण १९६ जणांनी घेतली माघार, ६९ उमेदवार बिनविरोध…
माघारीच्या अंतिम दिवशी सरपंचपदासाठी ५५ जणांनी तर सदस्य पदासाठीच्या १४१ जणांनी माघार घेतली. त्यामुळे तासखेडे येथे २ सदस्य, कामतवाडी, सुंदरपट्टी व हेडावे १ सदस्य, वावडे येथे २ सदस्य, खापरखेडा येथे ३ सदस्य, मारवड येथे २ सदस्य, कोंढावल येथे ७ सदस्य, अंतुर्ली येथे सरपंच व ७ सदस्य, डांगर येथे ५ सदस्य, चोपडाई येथे सरपंच व ७ सदस्य, रुंधाटी व मुंगसे येथे २ सदस्य, गंगापूरी येथे ६ सदस्य, नगाव बू. येथे १ सदस्य व नगाव खु. येथे ३ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. याआधी बाम्हणे व निमझरी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे तालुक्यातील एकूण ४ सरपंच व ६५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
निवडणुकीत अनेक गावात ग्रामविकासाचे मुद्दे कोसो दूर….
२० गावात निवडणुका होत असून अनेक गावात पॅनल प्रमुख किंवा उमेदवार आपली आर्थिक व वैयक्तिक समीकरणांची जुळवाजुळव करत असताना दिसून येत आहेत. मात्र गावाच्या विकासासाठी काय करणार ? हा मुद्दा उमेदवार व मतदार हे दोघे ही विसरल्याचे चित्र आहे. अनेक गावात मूलभूत सोई सुविधांचा बोजवारा उडाला आहे. अनेक गावात रस्ते, गटारी, पाणी आणि शौचालय यांचा मुद्दा पाच वर्ष सुरू असतो मात्र निवडणूक आल्यावर जाब विचारण्याचा विसर पडत असल्याने नेते वेळ निभावून नेतात. अनेक ग्रामपंचायतीत कर वसुली नावालाच असून सहा सहा महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. दूरदृष्टी व कामे करण्याची इच्छा नसल्याने ग्रामपंचायतीत निधी पडून आहे. निधी आल्यावर दिसली जागा की बांध इमारत या धोरणामुळे व टाऊन प्लॅनिंग नसल्याने अनेक गावांचे विद्रुपीकरण झाले आहे. गावाच्या विकासासाठी काय योजना राबवणार याचा खुलासा बहुसंख्य उमेदवारांनी व पॅनल प्रमुखांनी अद्याप मतदारांसमोर केला नाही. मात्र ग्रामस्थांनी याचा जाब विचारणे गरजेचे आहे.