राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे भूषण भदाणे यांची टीका…
अमळनेर:- निवडणूक मैदानातील पराभव जिव्हारी लागल्याने आपले दुखणे तरुणाईच्या मैदानी खेळास टार्गेट करून काढण्याचा प्रयत्न भाजप आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चालविला असून असले खेळ चालविल्यास आम्हीही जशास तसे उत्तर देणारा असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांनी दिला आहे.
प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात आमदार चषक च्या निमित्ताने लागलेले फलक भाजप व युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी काढण्याचा प्रयत्न केल्याने भुषण भदाणे यांनी हा पलटवार केला आहे. यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की विद्यार्थी व तरुणांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते. दोन वर्षे कोरोनामुळे मैदानी स्पर्धा बंद होत्या. आता कोणतेही निर्बंध नसल्याने खेळाला हातभार व प्रोत्साहन मिळावे, खेळाडुंच्या सुप्तगुणांना वाव मिळावा तसेच राज्यस्तरीय खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा नव्या खेळाडूंना व्हावा यासाठी या स्पर्धांचे आयोजन आमदार साहेबांच्या सहकार्याने तालुका क्रिकेट असोसिएशनने केले असून यात कोणतेही राजकारण नाही. विशेष म्हणजे या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धे मध्ये पक्षीय भेदच नसल्याने विविध पक्षांचे कार्यकर्ते खेळाडू म्हणून आनंदाने खेळत आहेत असे असताना भाजप आणि युवामोर्चा कार्यकर्त्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून केवळ दिशाभूल करण्यासाठी हे कृत्य केले आहे. प्रत्यक्षात प्रताप महाविद्यालयाच्या मैदानात आतापर्यंत अनेक मैदानी खेळाच्या स्पर्धा झाल्या मात्र कुणीही यास टार्गेट न करता उलट प्रोत्साहनच दिले आहे.मात्र खेळाबद्दल आदर नसलेल्या कार्यकर्त्यांनी दूध संघ निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला म्हणून असे खालच्या स्तराचे राजकारण केले आहे.मात्र स्वतःला युवा म्हणविणाऱ्यांनी युवांच्याच खेळाचा अनादर करणे त्वरित थांबवावे अन्यथा इतर डावपेचाच्या खेळात आम्हीही चांगलेच पारंगत आहोत असा इशारा भदाणे यांनी दिला आहे.