राज्य ग्रा.पं. कर्मचारी युनियनच्या वतीने उपस्थितीचे आवाहन….
अमळनेर:- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने नागपूर येथील जामठा स्टेडियमवर दिनांक 26 डिसेंबर सोमवार रोजी दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या अधिवेशनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री बच्चू कडू तसेच धैर्यशील मोहिते पाटील, युनियनचे राज्याध्यक्ष विलास कुमारवार, राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर, कार्याध्यक्ष काजी अल्लाउद्दीन, सचिव दिलीप डिके यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी सप्टेंबर 2020 ते मार्च 2022 या कालावधीतील किमान वेतनातील थकबाकी मिळणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करणे, तसेच निवृत्तीवेतन व उपदान योजना लागू करणे इत्यादी मागण्या यावेळी मंत्र्यांसमोर मांडण्यात येणार असून राज्यातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अधिवेशनासाठी राज्यातील 34 जिल्ह्यातून किमान 30 ते 40 हजार कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या अधिवेशनास उपस्थितीचे आवाहन ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, सचिव प्रदीप महाजन तसेच उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी केलेले आहे.