
तहसीलदारांच्या आदेशाने कारवाई, धान्यसाठ्यात आढळली तफावत…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानातून सेल्समनच्या संगनमताने रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या वाहन चालक व मालकावर मारवड पोलीस ठाण्यात दिनांक २८ रोजी तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशानुसार तालुका पुरवठा निरीक्षक बावणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दिनांक २६ रोजी रात्री गावकऱ्यांनी रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना वाहन धान्यासह पकडून दिले होते. त्या वाहनातील धान्य व स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध साठा यांचा पंचनामा करून लाभार्थ्यांना धान्याची टंचाई दाखवून अनियमितता करत लाभार्थ्यांना लाभ न देता रेशनिंगचे धान्य जास्तीचा भावाने स्वतःच्या लाभासाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी नेताना नागरिकांनी रंगेहाथ पकडून दिल्याने गोडावून व वाहनातील धान्याचा पंचनामा केला व त्यात तफावत व अनियमितता आढळून आली. दिवाळी किट ही न वाटता, धान्याची टंचाई दाखवून दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाल्याने स्वस्त धान्य दुकान क्रमांक १०५ व १०६ चे दप्तर ताब्यात घेऊन सेल्समन विकास सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानाचा सेल्समन अनिल काशिनाथ साळुंखे (रा. मारवड), वाहन चालक प्रशांत विजय पाटील (रा. जैतपिर), दिनेश वडर (रा. मारवड) या तिघांविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात पुरवठा निरीक्षक संतोष बावणे यांनी फिर्याद दिल्यावरून अत्यावश्यक वस्तू अधिनियम च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय राकेशसिंग परदेशी हे करीत आहेत.
धान्यसाठ्यात आढळलेली तफावत…
गहू १.१३ क्विंटल कमी, तांदूळ १६.७ क्विंटल जास्त, तसेच दिवाळी किट मधील उरलेले साहित्य तेल ९ किलो जास्त, दाल ३९ किलो जास्त, साखर १.३९ क्विंटल जास्त, रवा ९ किलो जास्त अशी तफावत आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.







