मंत्री मंगलमय प्रभात लोढा यांनी बैठकीत दिले आश्वासन…
अमळनेर:- राज्याचे महिला व बालविकास मंत्री मा.मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात काल झालेल्या मायाताई परमेश्वर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली.
याप्रसंगी मानधन वाढ, नवीन मोबाईल,पोषण ट्रॅकर, मिनी अंगणवाडी केंद्रांचे नियमित अंगणवाडीत रुपांतर यासह विसपेक्षा जास्त महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. सदर बैठकीत मानधन वाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून वित्त विभागाच्या मंजुरीनंतर लवकरच मानधन वाढ जाहीर करण्यात येईल, असे सांगत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लवकरच नवीन व उत्तम दर्जाचे मोबाईल पुरवण्यात येतील. पोषण ट्रॅकरची भाषा ही अंशतः मराठी झालेली आहे. पोषण ट्रॅकरची भाषा शंभर टक्के मराठी करण्यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकार सतत पाठपुरावा करीत असून त्यावर लवकरच निर्णय होईल, असे सांगत मिनी अंगणवाडी सेविकांना इतर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रमाणे रिक्त पदी थेट नेमणूक मिळण्यासाठी शासन विचाराधीन असल्याचे सांगितले. सेवा समाप्तीनंतर असंख्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या लाभाच्या थकीत रकमांबाबत बाबत एल.आय.सी. कडे पाठपुरावा करून त्या तात्काळ देण्याची कार्यवाही केली जाईल तसेच अतिरिक्त काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मेहनताना देण्याबाबत शासन विचाराधीन असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.
तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या गणवेशाच्या रकमेत वाढ करण्याबाबत लवकरच विचार केला जाईल. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सादिल खर्चाच्या रकमेमध्ये वाढ करण्यावर विचार सुरू आहे. मुख्य सेविका पदासाठीच्या भरती प्रक्रियेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वयाची सूट देण्याबाबतच्या प्रस्तावावर विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सूट देण्याबाबत शासन स्तरावर विचारपूर्वक निर्णय घेण्यात येईल. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना
व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा मोफत मिळावी यासाठी आरोग्य खात्याकडे पत्रव्यवहार करण्यात येईल तसेच अमृत आहार योजनेतील सध्या मिळणाऱ्या प्रति लाभार्थी दरामध्ये वाढ करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. असे मा.मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बैठकीत आश्वासन दिले. याचबरोबर लवकरच मानधन वाढ जाहीर करण्यात येणार असल्याचे मा. मंत्री महोदयांनी आवर्जून सांगितले. बैठकीत महिला व बालविकास विभागाचे अव्वर सचिवांसह वरिष्ठ अधिकारी तसेच संघटनेच्या वतीने मायाताई परमेश्वर,सुशीला कोळी, सुधीर परमेश्वर यांचा समावेश होता, असे संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी कळविले आहे.