कपिल पवार, उमेश काटे, रामदास शेलकर, अमळनेर महिला मंचचा समावेश…
अमळनेर:- येथील श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे चार जणांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आला. यात नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल जयकर पवार, येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल चे उपक्रमशील शिक्षक तथा दै. “सकाळ”चे पत्रकार उमेश प्रतापराव काटे, रामदास शेलकर (अमळनेर) या तीन व्यक्तींसह अमळनेर महिला मंच या संस्थेचा समावेश आहे.
या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (ता.२०) दुपारी चारला येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये होणार आहे. महाराष्ट्र शासनाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव चंद गोयल (आयएएस), जिल्हाधिकारी अमन मित्तल (आयएएस, जळगाव), मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया (आयएएस जळगाव), माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे सहावे “सृजन- भारत निर्माण” वार्षिक कार्यक्रमही होणार आहे. दरम्यान दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. यासाठी माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील, सुप्रसिद्ध अँड. गजेंद्र विंचुरकर, डॉ.अपर्णा मुठे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिनेश नाईक, प्रा. डी डी पाटील यांच्या समितीने ही निवड जाहीर केली. यात सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे उपसंचालक कपिल पवार यांना , शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणारे उमेश काटे यांना, कोरोना काळात आरोग्य क्षेत्रात रामदास शेलकर यांना तर अमळनेर महिला मंच ला संस्थागत पुरस्कार जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन बजरंग अग्रवाल, प्रा डी डी पाटील, सीए निरज अग्रवाल, प्राचार्य एच.बी. देवरे, उपप्राचार्य व्ही.पी. अमृतकर यांनी केले आहे.