उद्या पाडळसरेच्या जलसाठ्यात जलसमाधी घेणार…
अमळनेर:- येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे सात्री ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला असून त्याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
सात्री गावाचा पुनर्वसनाचा व पर्यायी रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावणेबाबत प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशाराही तहसिलदार यांना समितीचे प्रमुख सुभाष चौधरी व सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. सदर प्रश्नांवर यापूर्वीही समितीने ६ ऑक्टोंबर २०२२ रोजी तहसिलदार मिलिंद वाघ यांचेशी भेट घेवून चर्चा केली होती. यामुळे नायब तहसिलदार नवनाथ लांडगे यांनाही याबाबत अवगत करण्यात आले असून सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांनाही मेलद्वारे पाठवण्यात आलेली आहे.
गावठाणच्या मूल्यांकन कामास सुरुवात…
सात्री ग्रामस्थांच्या जलसमाधी आंदोलनाचा धसका घेत सन १९९९ पासून प्रलंबित असलेल्या गावठाण मूल्यांकनाच्या कामास सुरुवात करण्यात आली असून मात्र अन्य प्रश्न प्रलंबित असल्याने ग्रामस्थ जलसमाधी आंदोलनावर ठाम असल्याचे जिल्हा पुनर्वसन समिती सदस्य व माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी सांगितले आहे.