वाहनांच्या लागल्या लांब रांगा, रात्री उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ…
संरक्षण भिंतीसाठी सुधारित चार कोटी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार:- आ. पाटील
अमळनेर:- तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिरात खान्देशातील असंख्य भाविकांनी उपस्थिती लावत त्रिपिंडी महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर अनेक भाविकांनी रात्री येत दर्शन घेतले त्यामुळे उशिरापर्यंत वर्दळ सुरू होती.
“खान्देशातील भाविकांचे श्रद्धास्थान पुरातन कालीन श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिराचे संरक्षण करण्यासाठी भिंत उभारून बचाव करण्यासाठी शासन स्तरावर सुधारित चार कोटी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार आहे फाउंडेशन पक्के करून भिंत उभी राहिली तर तापी व पांझरा नदीच्या पुरापासून मंदिर सुरक्षित ठेवता येईल”, असे प्रतिपादन अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी कपिलेश्वर त्रिपिंडी महादेवाचे दर्शनासाठी आल्यावर सत्काराला समयी केले. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, तहसीलदार मिलिंद वाघ , उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव , एपीआय जयेश खलाने यांचीही उपस्थिती होती. आमदार स्मिता वाघ यांनी कपिलेश्वर मंदिर संस्थांकडून झालेल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की, रामेश्वर मंदिर व कपिलेश्वर मंदिराच्या संरक्षणासाठी संरक्षण भिंत उभारण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून येत्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.पाडळसरे येथून जवळच असलेल्या तापी पांझरा व गुप्त गंगेच्या त्रिवेणी संगमवरील श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे महाशिवरात्री निमित्ताने आमदार अनिल पाटील व माजी आमदार स्मिता वाघ ह्या दर्शनासाठी आल्या असतांना संस्थान कडून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महाशिवरात्री निमित्त प्रांतकालीन तापी आरती व तापीच्या पाण्यासह पंचामृताचा रुद्राभिषेक मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंदतीर्थ महाराज यांच्या हस्ते करण्यात आल्यावर सकाळ पासूनच आबालवृद्ध भाविकांची गर्दी या ठिकाणी झालेली होती. जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून रांगेत दर्शनाचा लाभ घेतला. सकाळीच माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड व्ही आर पाटील, अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे राष्ट्रीय सोशल मीडिया अध्यक्ष वसंतराव पाटील, शांताराम पाटील, धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष के डी पाटील, मंगेश पवार, संजय पाटील, सरकारी वकील अड राजेंद्र चौधरी, अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह गुर्जर, पंचायत समितीच्या सदस्य कविता पवार, मार्केटचे माजी सभापती प्रफुल्ल पवार, दोडे गुर्जर संस्थानचे विश्वस्त डॉक्टर एल डी चौधरी , ज्ञानेश्वर पवार तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी आदींनी भाविकांच्या रांगेत उभे राहून दर्शन घेतले , भारतीय जनता पक्षाचे अमळनेर शहर अध्यक्ष शीतल देशमुख व युवामोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत यांनी भाविकांना फराळ वाटप माजी आमदार स्मिता वाघ यांच्याहस्ते केले. यावेळी भाविकांनी तापी व पांझरा नदीत नौका विहाराचा आनंद घेत तीर्थाटन सोबत पर्यटनाचाही आनंद घेत हरहर महादेव म्हणत एकच गजर केल्याने दिवसभर परिसर दुमदुमून गेला. दुपारी ११ वाजता कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती हंसानंद महाराज यांनी कपिलेश्वर महात्म्य व तापीमाता महती प्रवचनातून विशद केली. या प्रवचनात शेकडो भाविकांची गर्दी होती. कळमसरे व निम येथील माध्यमिक विद्यालयाचे स्काऊट गाईड कडून परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर अमळनेर येथील मच्छी व्यापारी यांनी भाविकांची फराळ वाटप करून सेवा दिली. यात्रोत्सवात मारवड व नरडाने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. हा यात्रोत्सव सलग १५ दिवस साजरा होतो म्हणून या काळात भाविकांची गर्दी लक्षणीय असते. मंदिर संस्थानचे सचिव मगन पाटील, विश्वस्त डॉ एल डी चौधरी, डी एम पाटील, तुकाराम चौधरी, मंगल पाटील, मधुकर चौधरी, अंबादास चौधरी, लोटन पाटील, सी एस पाटील आदींनी यात्रोत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.