
जी एम सोनार नगर येथे शिवजयंतीचा शिवविचारांचा जागर…
अमळनेर:- भारतासारख्या विशाल देशाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श राजे लाभले. त्यांचा इतिहास हा अविस्मरणीय आहे. यासाठी आबाल वृद्ध यांनी एकविसाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या मनात कोरून ठेवावे. त्यांच्या विचारांची खाण जोपासल्यास तरुणांपुढे आदर्श राहील, असे प्रतिपादन प्रताप महाविद्यालयाचे प्राध्यापक जिग्नेश पाटील यांनी जी एम सोनार नगर येथे शिवजयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील होते. तसेच कैलास पाटील, वसुंधरा लांडगे, उज्वल पाटील, विश्वास पाटील, संजय पाटील, आर टी बागुल, आर बी पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
वसुंधरा लांडगे, उज्वल पाटील, कैलास पाटील यांनी पाळणा गीत गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर गीत गायनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रा. जिग्नेश पाटील यांनी आपल्या शैलीतून शिवाजी महाराजांचे विचार सांगितले. यावेळी कार्यक्रमाला मुंदडा नगर, जी. एम. सोनारनगर येथील महिला मंडळ, बाल गोपाल, सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश पाटील तर विजेंद्र पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. विलास पाटील, मुंदडा नगर, जी एम सोनारनगर येथील दुनियादारी ग्रुपचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.




