वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची मागणी…
अमळनेर:- वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची मागणी करत तालुक्यातील सोनखेडी येथील शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
प्रहार शेतकरी आघाडीचे प्रदीप किरण पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्जमाफी योजनेतील चुकीचे निकष व अर्धवट कर्जमाफी यामुळे शेतकऱ्यांमध्ये भेदभाव केला जातो. २०१७ मध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व सन २०१९ साली झालेली राज्य सरकारची महात्मा जोतीराव फुले कृषी सन्मान कर्जमाफी योजना यात अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यात लाखो शेतकऱ्यांचा समावेश असून ते लाभापासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना एक समान न्याय मिळत नाही, त्यामुळे काही शेतकऱ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे राज्य सरकारने बँकेची मदत घेवून वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या पण अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना निधी मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.