पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, शेतकऱ्यांत तीव्र नाराजी, त्वरित पंचनाम्याची मागणी…
अमळनेर:- तालुक्यात गेल्या ७ मार्च , १४ मार्च व १९ रोजी तालुक्यात वादळी पावसाने झोडपून काढले होते तर दिनांक २० मार्च रोजी पाडळसरे कळमसरे परिसरातील निम, तांदळी, बोहरे, गोवर्धन, कलाली, वासरे, खर्दे या भागात बेमोसमी वादळी पावसाने परिपक्व अवस्थेत असलेला मका, गहू, दादर, बाजरी, उन्हाळी ज्वारी आदी उभी पिके जमीनदोस्त झाल्याने हात तोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकरी वर्ग हतबल होऊन निराश झाला आहे मात्र याबाबत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलनात कृषी, महसूल, जिल्हा परिषदेचे कर्मचारी सहभागी झाल्याने कृषी अधिकारी यांचे स्थायी आदेश असूनही तालुक्यात अद्याप पंचनामे करण्यात आले नाहीत म्हणून शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत असून लवकरच पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी पेन्शन आंदोलनात सहभागी कर्मचारी दिनांक २१ पासून नियमित कामाला लागतील व पंचनामे करतील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी दिली आहे.
तालुक्यातील कळमसरे, पाडळसरे, नीम, तांदळी या परिसरात दिनांक २० रोजी तीन वाजेच्या सुमारास जवळपास १ तास जोरदार वादळी वारा विजेंच्या गडगडाटसह गारपिटीचा मोठ्या प्रमाणावर पाऊस होवून रब्बी हंगामातील मका, ज्वारी, बाजरी, गहू, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून तात्काळ पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. शेतकरी वर्ग आधीच हवालदिल झालेला असून ह्या आसमानी संकटाने त्रस्त झालेला आहे. या आधी दिनांक ७,१४, १९ मार्च रोजी बेमोसमी वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत बेमुदत संपात महसूल कृषी व जिल्हा परिषद कर्मचारी सहभागी झाल्याने अपूर्ण कर्मचाऱ्यांमुळे फक्त प्राथमिक माहिती संकलन सुरू होते. तर संप समाप्त झाल्याने दिनांक २१ पासून सर्व कर्मचारी नियमित कामावर येवून नुकसानग्रस्त शेतातील पंचनामे करतील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी दिली आहे.
दिनांक ७ ते १९ मार्च या कालावधीत अमळनेर तालुक्यात ४६ गावात ६२७ शेतकऱ्यांचे प्राथमिक अहवालानुसार जवळपास २६६.५० हेक्टर क्षेत्रातील रब्बी हंगामातील उभ्या पिकांचे नुकसान झाले असून त्यात मक्याचे १७१.५० हेक्टर, गहू ५३ हेक्टर, दादर २३ हेक्टर, बाजरी १५ हेक्टर वरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
प्रतिक्रिया:-
रब्बी हंगामातील ज्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी घाबरून न जाता कृषी व महसूल विभागाच्या वतीने स्थायी आदेश लागलीच जारी केले असून नुकसानग्रस्त शेतीपिकांचे पंचनामे करून भरपाई साठी प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर लवकरच पाठविण्यात येईल. मात्र पीकविमा काढलेल्या शेती पिकांचे नुकसान बाबत ७२ तासात क्रॉप इन्शुरन्स कंपनीच्या अँपवर नुकसान झालेल्या पिकाचा फोटोची माहिती लवकर द्यावी जेणेकरून कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी लवकर गती मिळेल.
:- भरत वारे, तालुका कृषी अधिकारी, अमळनेर