डांगरी येथील योगेश कोळी याची युनियन बँकेत निवड…
अमळनेर:- तालुक्यातील प्र. डांगरी येथील २२ वर्षीय शंभर टक्के दृष्टी गेलेल्या तरुणाने डोळसांना लाजवणारी कामगिरी केली असून त्याच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
प्र. डांगरी येथील शांताराम धर्मा कोळी यांचे चिरंजीव योगेश शांताराम कोळी याला शंभर टक्के दृष्टी नसताना देखील त्याची स्व-कष्टाने वयाच्या २२ व्या वर्षी युनियन बँकेत मुंबई येथे अधिकारी म्हणून निवड झाली आहे. योगेश याचे आईवडील हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्याचे दहावी पर्यंतचे शिक्षण धुळे येथे अंध शाळेत व त्यानंतर त्याने मुंबई येथे वसतिगृहात राहून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर आयबीपीएसच्या माध्यमातून त्याने परीक्षा देत हे यश मिळवले आहे. ऑनलाईन परीक्षा देतेवेळी योगेश याला आयबीपीएस कडूनच मदतनीस देण्यात आला होता. एकूण तीन परीक्षा देत त्याने यश मिळवले असून त्याला जवळपास ४.५ लाखाचे पॅकेज मिळाले आहे. अंध असूनही आई वडिलांच्या कष्टाचे चीज करणाऱ्या योगेशचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. योगेश याचा आमदार अनिल पाटील यांनी देखील सत्कार करत कौतुक केले. तसेच गावपरिसरातून विविध मान्यवरांच्या त्याचा गौरव करण्यात येत आहे.