सावळदे येथे तापी नदीत उडी टाकून संपविली जीवनयात्रा…
अमळनेर:- जवखेडा येथील ४५ वर्षीय इसमाने शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे तापी नदीत उडी टाकून आत्महत्या केली. मृतदेह १० एप्रिल रोजी दुपारी हाती असून मृताची ओळख पटली आहे. पंकज शिवदास पाटील (वय ४५, रा.जवखेडा ता.अमळनेर) असे मयताचे नाव आहे. ८ तारखेपासून सदर इसम बेपत्ता होता.
शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे दोन दिवसांपूर्वी तापी नदीच्या पुलावर दुचाकी उभी असल्याचे आढळून आले होते. गाडीजवळ शर्ट, चपला व आधार कार्ड आढळले होते. आधार कार्डवर पंकज शिवदास पाटील असे नाव होते. घटनास्थळावरील परिस्थितीवरुन नदीपात्रात संबंधिताने उडी टाकल्याचा संशय व्यक्त करून शोधास सुरुवात झाली. नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह दोन दिवसांनी १० एप्रिलला दुपारी हाती लागला. तपासणीत मृत पंकज शिवदास पाटील हाच असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा चुलत शालक तथा खर्दे पाथर्डे येथील रहिवासी भिकन पाटील यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी मात्र नापिकी, कर्जबाजारीपणामुळे त्रस्त होवून हे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू होती.