मुडी प्र. डांगरी येथील जखमी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु…
अमळनेर:- दुचाकीने धडक दिल्याने जखमी झालेल्या मुडी प्र. डांगरी येथील इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने अपघातास कारणीभूत दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मूडी प्र. डांगरी येथील विश्वास वामन बडगुजर हे दिनांक २८ एप्रिल रोजी गावातील गायमाता मंदिराकडून पायी घरी येत असताना एमएच १९ डीटी ०५२७ क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने जबर जखमी झाले. त्यांना नातेवाईकांनी अमळनेर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. त्याठिकाणी त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाचे ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र दिनांक ४ मे रोजी दवाखान्यातच त्यांना झटके येवू लागल्याने डॉक्टरांनी धुळे येथे हलविण्याचे सांगितल्याने त्यांना धुळे येथील खाजगी दवाखान्यात येथे दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून हिरे मेडिकल येथे हलविण्याचे सांगितले. हिरे मेडिकल येथे दिनांक ५ मे रोजी उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानतंर त्यांच्या मृत्यूची धुळे शहर पोलीसात नोंद करून गावी नेत सर्व धार्मिक विधी आटोपण्यात आले. त्यादरम्यान धडक देणारा दुचाकीस्वार हा गावातीलच नईम इमाम पिंजारी हा असल्याचे माहीत झाले. त्यावरून मृताची पत्नी सुरेखा विश्र्वास बडगुजर यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत नईम इमाम पिंजारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे. कॉ. भरत इशी हे करीत आहेत.