दोन निवृत्त जवान असलेल्या जुळ्या भावांचा ही समावेश…
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथील सहा तरुण तसेच दोन सेवानिवृत्त जवान अश्या एकाच गावातील आठ जणांनी पोलीस भरतीत यश मिळवले आहे. तसेच मारवड येथील तरुणाचीही रेल्वेत निवड झाली आहे.
तालुक्यातील अमळगाव येथील निलेश बुधा कुंभार, जयवंत संजय कुंभार, प्रशांत चुडामन कुंभार, लोकेश दीपक पाटील, शाम रामकृष्ण पारधी, सौरभ गुलाबराव कोळी या तरुणांनी पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत चांगले गुण प्राप्त केल्याने त्यांची निवड झाली आहे. निलेश कुंभार व जयवंत कुंभार यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वीटभट्टी व्यवसायावर असून ते दोघे प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तसेच प्रशांत कुंभार याचे आईवडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत यश मिळवले आहे. अमळगाव ग्रामपंचायतीचे शिपाई असलेल्या दीपक पाटील यांचा मुलगा असलेल्या लोकेश याने चोपडा येथे फार्मसीचे शिक्षण घेताना पोलीस भरतीत यश मिळवले. शाम पारधी याची पोलीस ड्रायव्हर पदावर निवड झाली असून त्याचा एक भाऊ मुंबई येथे पोलीस दलातच कार्यरत आहे. सौरभ कोळी याचे आईवडील शेतीकाम करत असून प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पोलीस भरतीची तयारी करून त्याने यश मिळवले आहे. यापैकी प्रशांत कुंभार याची बुलढाणा येथे तर इतर पाच जणांची मुंबई येथे निवड झाली आहे. आता टप्प्याटप्प्याने कागदपत्रे तपासणी व मेडिकल चाचणी झाल्यानंतर त्यांना नियुक्ती मिळणार आहे.
दोन जुळ्या भाऊ असलेल्या माजी जवानांची पोलीसात निवड…
अमळगाव येथील राजेश दिलीप पाटील व योगेश दिलीप पाटील ह्या दोन्ही भावांनी आधी सैन्य दलात सोबत निवड झाली होती. सैन्यदलात १७ वर्ष सेवा देत दोन्ही भाऊ सन २०२१ मध्ये सोबत रिटायर झाले त्यानंतर आता दोन्ही भावांनी मुंबई येथे पोलीस भरतीत यश मिळवले असून एक्स सर्व्हिसमॅन कोट्यातून दोन्ही भावांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. एकाच गावातून आठ जणांची पोलीस दलात निवड झाल्याने संपूर्ण तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.
मारवड येथील तरुणाची रेल्वेत निवड….
मारवड येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या भूषण उर्फ राजन सुरेश लोहार या कष्टाळू तरुणाची ग्रुप डी मार्फत रेल्वेत निवड झाली आहे. २७ वर्षीय भूषण याने इंदोर येथे डी ग्रुपचा पेपर दिला होता. या परीक्षेत यश मिळवत त्याची निवड झाली असून त्याची कागदपत्रे तपासणी व मेडिकल झाले आहे. त्याला मुंबई डीव्हिजन मध्ये पॉइंट्समन म्हणून नियुक्ती मिळणार आहे. भूषण यांचे वडील सुरेश लोहार हे सुतारकाम करून उदरनिर्वाह चालवत असून कष्टाळू कुटुंबातील तरुणाच्या या यशाने त्याचे परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.