लोण येथे निघाली तिरंगा रॅली, तालुक्यात ठिकठिकाणी मानवंदना…
अमळनेर:- तालुक्यातील लोण खु. येथील सैनिक लिलाधर शिंदे यांच्यावर काल दिनांक १९ रोजी शासकीय इतमामात व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आसामहून ४०० किमीवर अरुणाचल प्रदेशात भूतान सीमेवर त्यांची बदली झाल्याने आर्मीच्या ट्रक मध्ये २० जणांची तुकडी व खाद्यपदार्थ नेली जात होती. लीलाधर हे मागे बसलेले होते. पहाडी रस्त्यात अचानक ट्रकचा अपघात झाल्याने मागचे फाटक तुटल्याने लीलाधर शिंदे खाली पडून दगडाचा मार लागल्याने जागीच ठार झाले. त्यांचे शव मुंबई येथे आणण्यात येवून त्यानंतर छ. संभाजीनगर येथे विमानाने आणण्यात आले. काल छ. संभाजीनगर येथून गावी लोण येथे दुपारी १२ वाजता शव पोहचले. त्याठिकाणी मानवंदना म्हणून तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येवून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या मुलगा सुयश यांच्या हातून त्यांना अग्निडाग देण्यात आला. त्यांच्या पश्चात वृद्ध आईवडील, पत्नी सोनाली, मुलगा सुयश (वय १५), मुलगी मीनाक्षी (वय १२), मोठा भाऊ रवींद्र व लहान भाऊ शैलेंश असा परिवार आहे.