
तांबेपुरा येथील २१ वर्षीय तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी…
अमळनेर:- बेटावदकडून अमळनेर कडे येणाऱ्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक २० रोजी पहाटे २ ते ३ च्या दरम्यान घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील तांबेपुरा भागात राहणारा शुभम देविदास बाविस्कर (वय २१) व त्याचा मित्र शाहिद शेख मोहम्मद हे दोन्ही त्याच्या फॅशन प्रो गाडीने दिनांक २० रोजी पहाटे २ ते ३ च्या दरम्यान बेटावदकडून अमळनेर कडे येत असताना जैतपीर फाट्याजवळ एका अज्ञात चारचाकी वाहनाने भरधाव वेगाने गाडी चालवत मागून धडक दिली. तसेच गाडी न थांबवता पळून गेला. अपघातात शुभम याचा मृत्यू झाला असून शाहिद हा गंभीर जखमी झाला आहे. मयताचे मामा आत्माराम अहिरे याच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात अज्ञात चारचाकी वाहनधारकाविरुद्ध भादवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ मोटर वेहिकल ॲक्ट १३४, १८४/१७७ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ किशोर पाटील हे करीत आहेत.








