खर्चिक परंपरांना फाटा देत वीस जणांच्या उपस्थितीत विवाह संपन्न…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील भिल्ल आदिवासी समाजात खर्चिक परंपरांना फाटा देत केवळ वीस जणांच्या उपस्थितीत आदर्श विवाह संपन्न झाला.
मारवड गावात प्लाॅट भागात दिनांक २२ रोजी हा आदर्श विवाह संपन्न झाला. आजूबाजूला सर्वच समाजात लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असून त्यामुळे वधू व वरांकडील मंडळींना ताण येत असतो. मात्र मारवड येथील या विवाहात बॅन्ड, घोडा, तसेच अन्नदान यांना फाटा देत वधू व वराकडील दहा-दहा जणांच्या उपस्थितीत घरासमोरच अगदी आनंदात समारंभ पार पडला. मारवड येथील दगडू रामसिंग भील यांचा मुलगा नितीन दगडू मालचे व कै. युवराज भील यांची मुलगी आरती युवराज सोनवणे हे दोन्ही अत्यंत साध्या पद्धतीने विवाह बंधनात अडकले. पंधरा दिवसांपूर्वीच दोन्हीकडच्या जाणत्या मंडळींची बैठक होवून असा अत्यल्प खर्चात विवाह करण्याचे निश्चित केले व वधू वरांनी त्यास होकार दिल्याने अत्यंत कमी खर्चात हा विवाह पार पडला. अश्या सुधारणावादी संकल्पनांचा आदर्श घेवून समाजात होत असलेल्या विविध खर्चिक बाबी टाळाव्यात असे मत सर्वत्र व्यक्त होत आहे.