
रफिक उर्फ काजल शेख रशीद अमरावती सेंट्रल जेलात स्थानबद्ध…
अमळनेर:- अमळनेर पोलिसांनी स्थानबद्धतेची चौथी कारवाई रफिक उर्फ काजल शेख रशीद याच्यावर केली असून त्यास अमरावती सेंट्रल जेल येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींपैकी अमळनेर शहरातील दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभे तसेच अत्यंत दहशत व गुन्हेगारी करणारा शिवम उर्फ शुभम उर्फ दाऊद मनोज देशमुख तसेच विशाल विजय सोनवणे या तिन्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी वाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन व्यक्ती आणि वाळू तस्कर तसेच अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालने बाबतचा अधिनियम 1981 प्रमाणे कारवाई करून त्यांना नाशिक रोड सेंट्रल, नागपूर सेंट्रल जेलमध्ये स्थानबद्धेची मोठी तीन कारवाई करण्यात आल्या होत्या. काल शहरातील अत्यंत चलाख, दलाली करणारा तसेच शासकीय कामात अडथळा करून जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्फोटक पदार्थ व हत्यार जवळ बाळगणारा गुन्हेगार रफिक उर्फ काजल शेख रशीद, (वय वर्ष ३७ राहणार गांधलीपुरा) याच्यावर पोलिसांनी एमपीडीएची चौथी कारवाई करत त्यास अमरावती सेंट्रल जेल येथे स्थानबद्ध करण्यासाठी रवाना करण्यात आले. रफिक उर्फ काजल याच्यावर आजपावतो दाखल पात्र एकूण ११ गुन्हे, अदखल पात्र एकूण ०६ गुन्हे, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदे अंतर्गत एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (ब) प्रमाणे हद्दपार एकूण ४ वेळेस तर एकूण ०५ वेळेस प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. सदरील आरोपीवर दाखल गुन्ह्यांपैकी प्रामुख्याने जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, धारदार शस्त्र, बंदुकीचा वापर, स्फोटक पदार्थ जवळ बाळगून आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे, जातीयवादी गुन्हे करणे, दंगल माजवून गर्दी करून शस्त्र जवळ बाळगून लोकांमध्ये दहशत घालणे, बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, एवढेच नव्हे तर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच शासकीय कामात अडथळा करणे असे गुन्हे दाखल होते. सदर धोकादायक इसम हा हद्दपार करून तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील आदेशाचे पालन करीत नव्हता. तसेच अनेक वेळा त्याचे चांगले वर्तणुकीचे बॉण्ड घेऊन देखील त्याचे तो पालन करत नव्हता. कोणत्याही प्रकारच्या कायद्याची त्यास भीती राहिलेली नव्हती. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीने त्याने लोकांची मालमत्ता व जीवित धोक्यात आणले होते.
त्यामुळे अमळनेर पोलिसांनी त्याच्यावर स्थान बद्धतेची कारवाई केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला चार्ज घेतल्यापासून अवघ्या पाच महिन्यात अमळनेर शहरातील अट्टल गुन्हेगारांवर ४ गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. च्या कारवाई केली आहे.
या कारवाई करताना प्रामुख्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस अंमलदार किशोर पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, शरद पाटील, सिद्धांत सिसोदे, सहा.पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पीएसआय विकास शिरोळे, बापू साळुंखे, कपिल पाटील, सुनिल पाटील, योगेश श्रावण पाटील, घनशाम पवार, जितेंद्र निकुंभे, हर्षल पाटील, मिलिंद बोरसे, नाजिमा पिंजारी, नम्रता जरे, होमगार्ड कैलास पाटील या सर्वांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नजन पाटील यांची मदत लाभली असून त्यांचे सहकारी पोलीस हवालदार सुनील दामोदरे यांनी देखील या कारवाईमध्ये काम केले आहे.
जनतेस प्रताडीत करणारे व वेठीस धरणाऱ्या जिल्ह्यातील अशा प्रकारच्या गुन्हेगारांना परिणामकारक कारवाई केली पाहिजे यासाठी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी तसे आदेश दिले होते. त्यावरून अमळनेर पोलिसांनी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.








