सोशल मिडियाद्वारे आवाहन करीत नऊ दिवसातच तीन लाखांवर मिळवली मदत…
अमळनेर:- तालुक्यातील करणखेडे येथील रहिवासी असलेल्या दहावीत शिकत असलेल्या राहुलच्या यकृत प्रत्यारोपणासाठी सोशल मिडियाद्वारे आवाहन करीत नऊ दिवसातच तीन लाखांवर मदत मिळवत कुटुंबीयांकडे त्या रकमेचा धनादेश देण्यात आला.
करणखेडे येथील संतोष धोंडू पाटील हे पोटापाण्यासाठी आपल्या परिवारासह पुणे येथे वास्तव्यात आहेत.संतोष पाटील हे एका खाजगी कंपनीत वॉचमन म्हणून नोकरी करतात तर त्यांच्या पत्नी छायाताई या धुणी-भांडीची कामे करून संसाराला हातभार लावतात. त्यांना दोन अपत्य असून मोठी मुलगी नंदिनी ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे. तर लहानगा राहुल हा दहावीला शिकत आहे. दुर्दैवाने चि.राहुलचे यकृत निकामी झाले असून लवकर त्याचे यकृत प्रत्यारोपण न झाल्यास राहुलच्या जीवाला धोका उद्भवू शकतो असे पुण्याच्या मेडिकव्हर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याने कुटुंबीयांची हतबल अवस्था झाली होती. एकुलता लेक, घरची परिस्थिती अत्यंत दयनीय, आणि अशातच मुलाचे हे आजारपण आता काय करावे? असा यक्ष प्रश्न या परिवारापुढे उभा राहिला आहे.राहुलची मोठी बहीण नंदिनी आपल्या भावाला यकृत दान देण्यास तयार झाली असून मात्र पैशांअभावी शस्त्रक्रिया रखडलेली आहे. तब्बल 21 लाख रुपयाचा खर्च या शस्त्रक्रियेसाठी होणार असून या परिवाराला एवढ्या रकमेची तजवीज करणे शक्य नसल्याने अशा अडचणीच्या वेळी राहुलचे औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी आपल्याकडूनही आर्थिक मदत व्हावी यासाठी गावातील तरुणांनी प्रथमता गावात झोळी फिरवून आर्थिक मदत संकलित केली. व सोशल मीडियाच्या माध्यमातून “देणाऱ्याने देत जावे” या नावे दि. 14 ते दि. 22 मे पर्यंत नऊ दिवसासाठी व्हॉट्सॲप ग्रुप बनवून त्या माध्यमातून राहुलच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करण्यासंदर्भात दानशूर दात्यांना आवाहन केले. या नऊ दिवसात दानशूरदात्यांनी राहुलला आर्थिक स्वरूपात भरभरून आशीर्वाद दिले व राहुलच्या आरोग्यासाठी परमेश्वराला साकडे घातले असून या दात्यांच्या दातृत्वातून तब्बल तीन लाखाच्या वर निधी राहुलच्या शस्त्रक्रियेसाठी प्राप्त झाला आहे.
दात्यांच्या दातृत्वातून प्राप्त झालेला या निधीचा धनादेश राहुलच्या आई सौ.छायाबाई संतोष पाटील व त्याला यकृत दान करून जीवनदान देणारी त्याची मोठी बहीण कु.नंदिनी यांना अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या अर्धांगिनी मनीषा शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पी.आय. विजय शिंदे साहेब यांनी स्वतःही या परिवाराला आर्थिक मदत करून सोशल मीडियावर अशा अडचणीच्या वेळेस आर्थिक पाठबळ देऊन मदत करणाऱ्या सर्व दात्यांच्या बाबतीत गौरवद्गार काढले.
राहुलच्या शस्त्रक्रियेसाठी दात्यांना आर्थिक मदत करायची असल्यास राहुलचे मामा निंबा रतिभान सूर्यवंशी यांच्या 9011050255 या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन पे व गुगल पेच्या माध्यमातून मदत करू शकतात.